अहिल्यानगरमध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन, मधमाशी पालनासाठी सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान

अहिल्यानगर जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले. मधमाशीपालनासाठी मोफत प्रशिक्षण व ५०% अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांनी मुख्य व्यवसाय म्हणून मधपालन स्वीकारल्यास रोजगार वाढीस मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

Published on -

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी चांगली बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले असून, हे यश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे.

१,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन

जिल्ह्यात आतापर्यंत २,५६८ मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत, यापैकी १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन घेण्यात आले. यामुळे मधमाशीपालनाच्या क्षेत्रात जिल्ह्याने मोठी भरारी घेतली आहे, असे ग्रामोद्योग अधिकारी बी. आर. मुंडे यांनी सांगितले.

मोफत प्रशिक्षण

मधमाशीपालन सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकरी व व्यक्तींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर ५० टक्के अनुदानावर आवश्यक साहित्य देण्यात येते. उर्वरित ५०% खर्च लाभार्थ्याला करावा लागतो. त्यामुळे अल्प गुंतवणुकीत मोठा नफा मिळवणारा उपक्रम म्हणून मधमाशीपालन लोकप्रिय होत आहे.

अकोले आणि राहुरी तालुक्यांमध्ये सर्वाधिक गती

नगर जिल्ह्यातील अकोले आणि राहुरी तालुक्यांमध्ये मधमाशीपालनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, इथे सर्वाधिक मधपेट्यांचे वितरण झाले आहे. दरवर्षी नियोजित उद्दिष्टानुसार मधपेट्यांचे वितरण केले जाते.

मधाचे हमीभाव

राज्य शासनाकडून मधासाठी २०० ते २५० रुपये प्रति किलो हमीभाव निश्चित केला जातो. मात्र उत्पादकांना आपल्या मधाची स्वतंत्र विक्री करण्याची मुभा दिली गेली आहे, असे निरीक्षक वसंत चौधरी यांनी स्पष्ट केले.

मुख्य व्यवसाय

मधमाशीपालन हा केवळ शेतीला पूरक व्यवसाय न राहता, स्वतंत्र व पूर्णवेळ उद्योग म्हणून विकसित करता येतो. यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ तर होतोच, पण ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळते.

मार्गदर्शनासाठी संपर्क

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी अहिल्यानगर येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा.

“मधमाशीपालन हा बहुउद्देशीय, पर्यावरणपूरक व नफा मिळवणारा उद्योग आहे. योग्य मार्गदर्शन आणि सरकारी सहाय्य मिळाल्यास ग्रामीण भागात क्रांती घडवू शकतो.”
– बी. आर. मुंडे, ग्रामोद्योग अधिकारी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News