Ahmednagar News : बापरे ! मिरचीचे बियाणे आठ हजार रुपये किलो

Ahmednagarlive24 office
Published:
chilli farming

Ahmednagar News : पावसाळ्याला काही दिवस शिल्लक असताना शेतकरी खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या बियाण्याची जुळवाजुळव करत आहेत. मात्र पेरणीसाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा काही बियाणे विकणाऱ्यांनी घेणे सुरू केले असून यात शेतकऱ्यांची सर्रास लूट करताना पहावयास मिळत आहे.

मिरची बियाणांचे १० ग्रॅमचे पाकिट ५५० रुपयांपासून तर ८०० रुपयांपर्यंत विनाबिल बाजारात विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समजली असून या फसवेगिरीने शेतकरी हतबल झाला आहे. बियाण्यांचा प्रतिकिलो भाव तब्बल आठ हजार रुपये किलो झाला आहे.

यावर शासकीय यंत्रणेचा अंकुश राहिला नाही का असा सवाल शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना मिरची बियाण्याची पेरणी एक महिन्याअगोदर करून जुलै महिन्यात लागवडीसाठी शेत तयार करावे लागते. वाफे देखील पाडून ठेवावे लागतात.

वाफ्यात शेणाच्या गौऱ्या जाळून खत तयार करून त्यात पाणी सोडावे लागते. मग मिरची बियाण्याची पेरणी करावी लागते. पेरणी केल्यावर शेतकऱ्याला दररोज पाणी घालून लागवडीयोग्य रोपे तयार करावी लागतात. एवढी सारी मेहनत शेतकऱ्यांना करावी लागत असताना हिरवी मिरची खाण्यायोग्य होते तेव्हा तिला दोन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलला मिळतात.

हे कमी की काय म्हणून बियाण्यांची अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. मिरची बियाणे ५५० ते ८०० रुपये १० ग्रॅम भावाने विकले जात आहे. त्यामुळे शासनाचे खरे अभय शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना हा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या बाजारात मिरची बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी जात आहेत. पण कृषी केंद्रात मिरची बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकरी कर्ज काढून तसेच घरातील सोने-नाणे गहाण ठेऊन महागडे बियाणे मजबुरीने खरेदी करीत असल्याची प्रतिक्रिया काही शेतकरी देत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe