Ahmednagar News : अहमदनगरमधील अनेक भागातील शेतकरी आता वेगवेगळ्या माध्यमातून शेती करत आहेत. शेतीतून उत्तम असे उत्पादन घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव देपा (ता. संगमनेर) येथील शेतकऱ्यांनीही एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
या गावातील शेतकरी शेततळ्यांच्या माध्यमातून दरवर्षी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत आहे. यंदा देखील कठीण परिस्थिती असताना टोमॅटोच्या लागवडी सुरू केल्या असल्याचे सुखावह चित्र पाहावयास मिळत आहे.

पिंपळगाव देपा गावांतर्गत मोधळवाडी, खंडेरायवाडी आदी वाड्या-वस्त्या आहे. येथील शेतकऱ्यांची शेती ही पावसावरच अवलंबून असते आणि उन्हाळा लागला की टँकर शिवाय पर्याय नसतो. वर्षानुवर्षापासून ही परिस्थिती चालत आली आहे.
मात्र येथील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली आहे. जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे शेततळे आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शेतकरी शेततळी भरून ठेवतात आणि पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर टोमॅटोची लागवड करत असतात. त्यामुळे टोमॅटोचे आगार म्हणून हा संपूर्ण परिसर ओळखला जात आहे.
विशेष बाब म्हणजे येथील शेतकऱ्यांची जमीन अतिशय चांगल्या पद्धतीची असल्याने टोमॅटोचे पीकही चांगले येत आहे. बाजारभावही चांगला मिळत असतो, परिणामी उत्पन्नही चांगले मिळते. सध्या शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागवडी सुरू केल्या आहेत.
विशेष म्हणजे शेतकरी मल्चिंग पेपरवरच लागवडी करत आहे. यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो. जवळपास एक महिना पुरेल एवढे पाणी सध्या शेततळ्यांमध्ये आहे. त्यातच पावसाळाही तोंडावर आला आहे.
त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षापासून या अनुषंगाने नियोजन करून टोमॅटोच्या लागवडी करत असतात. यंदा देखील ही परंपरा जपली आहे.येथील एक शेतकरी सांगतात की, शेततळ्याच्या माध्यमातून एक एकर शेतात मल्चिंग पेपरवर टोमॅटोची लागवड केली आहे.
आणखी चार ते पाच एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करायची असून रोपेही बुक केली आहे. दरवर्षी टोमॅटो लागवड करत असल्याने कधी म्हणावा तसे बाजारभावही मिळत नाही पण कधी चांगले बाजारभाव मिळाले तर पैसेही मोठ्या प्रमाणात मिळतात.