Farming News : पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, कोरडा दुष्काळ जाहीर करा

Ahmednagarlive24 office
Published:
Farming News

Farming News : मतदार संघात पावसाने मागील २१ दिवसांपासून २५ दिवसांपर्यंत उघडीप दिल्याने पिके वाळून चालल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, याची गांभीर्याने दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

आ. काळे यांची मागणी या संदर्भात आमदार काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील यांना नुकतेच निवेदन दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे की, चालू हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने मतदार संघात खरीप पेरण्या होतील की नाही, याबाबत शेतकरी साशंक होते. परंतु पडलेल्या अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होवून बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या मात्र, पेरण्या झाल्यानंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही, अशी एकवेळ अवस्था होती.

परंतु कसेबसे पेरलेले उगवले व सर्वच पिके जोमात असतांना पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे मागील २५ दिवसांपासून मतदार संघातून पाऊसच गायब झाल्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा प्रत्यय यंदाच्या खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना आला आहे.

याचा मोठा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होणार असून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार असून अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अद्याप कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. पेरणी होताच धो-धो बरसणारा वरुणराजा यावर्षी ऐन गरजेच्या वेळी गायब झाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप तर जाणारच आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी, अशी मागणी आ. काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe