इंधन दरवाढीने हैरान बळीराजाने हाती धरला पारंपरिक लाकडी नांगर!

Ahmednagarlive24 office
Published:

पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्या बळीराजाचा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी. मात्र, आजच्या आधुनिक काळात ही बैलांची नांगरणीही अनेक भागात थांबली असून त्याऐवजी शेतकरी पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टर वापराकडे वळला आहे.

मात्र आता इंधन दर वाढ झाल्याने ट्रॅक्टर व पॉवर ट्रिलरची भाडे वाढ देखील झाली आहे. नांगरणी, चिखलणी, मशागतीची कामे ट्रॅक्टर, पॉवर टेलरने करणे शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याने विक्रमगड तालुक्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी लाकडी नांगर हाती धरला आहे.

शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे असणारी खिलारी बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक दोन जोड्या आणि बैलगाडी असे चित्र असते. एकदा जून महिना उजाडला की, शेतकरी जमिन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे,

नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरणी व चिखलणीसाठी लागणाऱ्या फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामांची लगबग सुरू होते.
ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागत, नांगरणी, चिखलणी कामासाठी पॉवर ट्रिलर वापरु लागला आहे.

लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलर, ट्रॅक्टरचा वापर केल्याने शेतकऱ्यांची वेळेची बचत होत असते. मात्र या वर्षी इंधन दर वाढ मोठया प्रमाणात झाल्याने ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलरचे गेल्या वर्षी ५५०-६०० रुपये एका तासाचे भाडे द्यावे लागत होते. ते या वर्षी ७०० ते ८०० रुपये द्यावे लागत आहे. तर ट्रॅक्टरचे ७००

ते ८०० रुपये एका तासाचे भाडे या वर्षी ९०० ते १००० रूपये भाडे दयावे लागत आहेत. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर पेक्षा लाकडी नागरांने नांगरणी परवडणारी असल्याने या वर्षी विक्रमगड तालुक्यातील अनेक भागात लाकडी नांगराने नांगरणी करताना दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तर सध्या मजूरांची शेतीच्या कामासाठी कमतरता असली तरी काही ग्रामीण भागात शेतमजुराचे दर गगनाला भिडले आहेत. पाच-सहा वर्षा पूर्वी महिलाना १०० व पुरुषांना १५० रूपये मजूरीचे दर दिले जात होते. परंतु या वर्षी महिला २५० ते ३०० व पुरुष ३०० ते ३५० रूपये मजुरीचे दर दयावे लागत आहेत

या वर्षी इंधन दर वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलरची मोठी भाडे वाढ झाली आहे. त्यातच खताचे, बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतीचा खर्च दुप्पट वाढला आहे. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलरने शेतीची कामे करणे खर्चिक होत आहे. लाकडी नांगराने शेतीची नांगरणी, चिखलणी या दर वाढीत परवडू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe