शिर्डी :सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी बाजार समितीला राज्यात वेगळं स्थान मिळवून देत आहे.
नव्याने सुरू झालेल्या म्हैस बाजारामुळे परिसरातील म्हैस पालक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी सांगितलं.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने लोणी येथे म्हैस खरेदी-विक्रीच्या बाजाराचा शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते केला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती बापूसाहेब आहेर होते.
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, किसनराव विखे, संपतराव विखे, अशोकराव धावणे, सुभाष गमे, बंडू लगड, लक्ष्मण बनसोडे, बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे, सर्व संचालक, व्यापारी आणि शेतकरी उपस्थित होते.
पहिल्याच व्यवहारात संतोष संपत गदाई आणि सुरेश ओंकार गदाई यांच्या म्हशीला २ लाख ७० हजार रुपयांची बोली लागली आणि या बाजाराचा शुभारंभ झाला. माजी मंत्री म्हस्के म्हणाले की, बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्य निर्मिती कारखाना हा दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.
ज्ञानेश्वर चौधरी यांनी पणन विभाग आणि विशेषतः मंत्री विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. भीमराज निर्मळ यांनी आभार मानले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, “शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, हा उद्देश ठेवून बाजार समिती वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करत आहे.
कांदा, भुसार, भाजीपाला, डाळिंब, गाई-शेळी बाजार आणि आता म्हैस बाजार सुरू करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी बाजार समितीचं व्यवस्थापन घेत आहे, हे समाधानकारक आहे.”