Camel Milk kulfi : तुम्ही आजपर्यंत गाई आणि म्हशीच्या दुधाची कुल्फी खाल्ली असेल. मात्र उंटाच्या दुधाची कुल्फी आणि आईस्क्रीम कधीही खाल्ली नसेल. आता भारतामध्ये लवकरच उंटाच्या दुधाची कुल्फी आणि आईस्क्रीम तयार होणार आहे.
तुम्हाला लवकरच आता उंटाच्या दुधाची आईस्क्रीम आणि कुल्फी खायला मिळेल. बिकानेरमध्ये स्थित राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र अनेक दिवसांपासून उंटाच्या दुधाचे अनेक पदार्थ विकसित करण्यासाठी काम करत आहे.
जयपूरमधील एका शेतकऱ्याने जागतिक उंट दिनानिमित्त राष्ट्रीय उंट संशोधन केंद्राशी करार केला आहे. शेतकरी सुरेंद्र अवाना यांनी करार केला आहे. हे त्यांच्या रुद्र शिवम डेअरीच्या माध्यमातून उंटाच्या दुधापासून अनेक उत्पादने तयार करणार आहेत.
सर्वात प्रथम कुल्फी आणि नंतर चॉकलेट आणि आईस्क्रीम बनवणार
शेतकरी सुरेंद्र अवाना म्हणाले की, जागतिक उंट दिनाच्या दिवशी अनेक शेतकरी बिकानेर एनआरसीसी कॅम्पसमध्ये गेलो होतो त्यावेळी फक्त मी म्हणजेच माझी रुद्र शिवम डेअरी या कंपनीने हा करार केला आहे.
यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबाबत करार करण्यात आले आहेत. त्यासाठी मी तयारीही सुरू केली आहे. आम्ही उंटाच्या दुधाच्या कुल्फीपासून सुरुवात करत आहोत. त्यासाठी आवश्यक भांडी खरेदी करण्यात आली आहेत. मी कुल्फीचे साचे पण आणले आहेत. येत्या काही दिवसांत कुल्फीचे उत्पादन सुरू होईल असे शेतकरी अवाना यांनी सांगितले आहे.
अवाना पुढे बोलताना म्हणाले, “कुल्फीनंतर उंटाच्या दुधाचे चॉकलेट बनवण्याचे काम सुरू केले जाईल. यानंतर इतर उत्पादने तयार होतील. जयपूर आणि परिसरातील ही पहिली डेअरी असेल, जी उंटाच्या दुधापासून उत्पादने बनवत आहे. त्यामुळे या भागातील लोकांना उंटाचे दूधही सहज मिळणार आहे.
कोण आहे प्रगतीशील शेतकरी अवना?
सुरेंद्र अवाना हे राज्य आणि केंद्र सरकारने पुरस्कृत केलेले प्रगतीशील शेतकरी आहेत. या शेतकऱ्याने जयपूरमध्ये त्यांची स्वतःची रुद्र शिवम नावाची डेअरी सुरु केली आहे. कृषी क्षेत्रातील नवोपक्रमासाठी नऊ वेळा भारत सरकारकडून पुरस्कार देण्यात आला आहे.
बिचोनमध्ये अनेक कुटुंबांकडे उंटांचे मोठे कळप आहेत
जयपूर जिल्ह्यातील बिचोन जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे उंटाचे मोठे कळप आहेत. त्यामुळे अवाना यांनी उंटाच्या दुधापासून कुल्फी आणि आईस्क्रीम बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या ठिकाणी उंटाचे दूध मोठ्या प्रमाणात असल्याने त्यापासून दुधाचे पदार्थ बनवण्यात यश मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.