पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामान बदलाच्या अनुकूल आणि जैविकदृष्ट्या प्रबळ असलेल्या ६१ पिकांचे १०९ वाण देशाला समर्पित केले.
दिल्लीच्या पुसा परिसरातील आयसीएआरच्या तीन प्रायोगिक शेतींमधून वाण जारी करत मोदींनी कृषी शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी मोदींनी नवीन वाणांचे महत्त्व अधोरेखित केले.
तर शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांचीही उपस्थिती होती. मोदींनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना, कृषी क्षेत्रात मूल्य संवर्धनावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
तसेच आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक आहे. नवीन वाणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न, उत्पादन वाढेल आणि खर्च कमी येईल, असेही चौहान म्हणाले. भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयसीएआर) ही वाण विकसित केली आहेत.
यामध्ये बाजरी, नाचणी, ज्वारी, मका, गहू, तूर, हरभरा, मसूर, वाटाणा, फळे, भाजीपाला, कंदमूळ, मसाले, औषधी वनस्पती यांचा समावेश आहे. तृणधान्यांचे २३ वाण आहेत, तर तांदळाचे नऊ,
तेलबियांचे सात, उसाचे सात, कापसाचे पाच नवे वाण आहेत. हे वाण अधिक उत्पादन देतात, त्यांना पाणी कमी लागते, ते हवामान बदलानुरूप आहेत.
यामुळे आता शेतकऱ्यांच्या उत्पनात मोठी भर पडणार आहे. उत्पन्न वाढीस हे वाण उपयुक्त ठरतील. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.
हे वाण अधिक उत्पादन देतात, त्यांना पाणी कमी लागते. हवामान बदलाच्या अनुकूल आणि जैविकदृष्ट्या प्रबळ असलेले हे ६१ पिकांचे १०९ वाण उत्पादन क्षमतेत भर घालतील अशी अपेक्षा आहे.