Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे आता पूर्वापार चालत आलेली परंपरागत म्हणजेच फक्त उदरनिर्वाह पुरती शेती ही संकल्पना आता कधीच मागे पडलेली आहे. प्रचंड प्रमाणात कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आता तरुण शेतकऱ्यांनी कष्टाला तंत्रज्ञानाची जोड देत आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली व शेतीचा चेहरा मोहराच पार पालटून गेला.
पूर्वी घेण्यात येत असलेली ज्वारी, बाजरी सारख्या इतर पिकांची जागा आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक भाजीपाला पिके व फळबागांनी घेतली आहे. फळबागांमध्ये देखील आता द्राक्ष आणि डाळिंब तसेच पेरू यांच्यासोबत स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट, तसेच सफरचंदाचे प्रयोग देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहेत. बरेच शेतकऱ्यांनी सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने वापर करून अशा नवनवीन फळबागांची लागवड करून ते यशस्वी केलेत.
याच पद्धतीने जर आपण नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या रायते या गावच्या चव्हाण दांपत्याची यशोगाथा पाहिली तर टीव्ही पाहत असताना त्यांना ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती मिळाली व त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निश्चय केला व दोन एकर मध्ये यशस्वी ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. नेमके त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केले व कशा पद्धतीने या शेतीतून त्यांना फायदा होत आहे? इत्यादी बद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
ड्रॅगन फ्रुट मधून साधली आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या रायते या गावचे सरला आणि जगन्नाथ चव्हाण या दाम्पत्याकडे एकूण पाच एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते अगोदर वांगी तसेच टोमॅटो, मका आणि कांद्यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेत असत व काही जिरायती पिके देखील अगोदर घ्यायचे.
परंतु या पिकांमधून लागणारा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये खूपच तफावत निर्माण होत असल्यामुळे काहीतरी नवीन शेतीत करावे ही इच्छा त्यांच्या मनामध्ये कायमच होती. या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी शाश्वत असे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत मिळावा अशा पिकाच्या शोधामध्ये हे दांपत्य होते.
अशातच 2018 मध्ये टीव्ही पाहत असताना त्यांना ड्रॅगन फ्रुट या फळाविषयी माहिती मिळाली.या कार्यक्रमामधून त्यांना कळून चुकले की आपल्याकडील हवामान, पाणी तसेच बाजारपेठ या पिकासाठी किफायतशीर असल्यामुळे त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचा निर्णय घेतला व 2019 मध्ये पाच एकर मधून दोन एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवड केली.
यामध्ये मशागतीपासून तर रोपे आणि इतर सर्व बाबीं करिता त्यांना एका एकर करिता तीन लाख 75 हजार रुपये इतका खर्च आला. स्वतःकडचे काही पैसे आणि इकडून तिकडून पैशांची तजवीज करून त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड केली व घरच्यांच्या मदतीने शेतीची कामे करण्यावर भर दिला. ड्रॅगन फ्रुट लागवडीकरता त्यांनी हैदराबाद येथून रोपे विकत आणली.
अशा पद्धतीने केले त्यांनी व्यवस्थापन
ड्रॅगन फ्रुट लागवडी मागे असलेले सर्व बारकावे कळावेत व त्याचा उपयोग स्वतःच्या शेतात लावलेल्या ड्रॅगन फ्रुट मध्ये करता यावा याकरिता सरला चव्हाण यांनी छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील अनुभवी ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांकडे भेटी दिल्या.
त्यांचे मार्गदर्शन व इतर माध्यमातून मिळवलेली माहिती यांचा वापर करून त्यांनी ड्रॅगन फ्रुट पिकाचे व्यवस्थापन केले. या सगळ्या प्रयत्नातून त्यांना पहिल्याच वर्षी प्रति एकर तीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळाले. त्यानंतर लागणारा भांडवली खर्च कमी झाला.
या उत्पादनामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला व त्यांनी परत दोन एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला व आता एकूण चार एकर क्षेत्रावर त्यांचे ड्रॅगन फ्रुट लागवड आहे. पहिल्या टप्प्यात लागवडी करिता त्यांनी बारा बाय सात फूट चे अंतर ठेवले.
एका एकर ला 550 खांब लागले. नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी अंतर कमी करत ते अकरा बाय सात फूट इतके ठेवले व याकरिता त्यांना सहाशे खांब लागले.यामध्ये या पिकाला फळ लागवडीच्या कालावधीमध्ये जास्त पाण्याची गरज भासते. मात्र त्या कालावधीमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे पावसाची गरज पूर्ण होते.
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता यावा याकरिता त्यांनी सेंद्रिय टाकाऊ घटकांचे आच्छादन केलेले आहे. या आच्छादनामुळे उन्हाळ्यामध्ये खूप मोठा फायदा होतो. ड्रॅगन फ्रुटला त्यांनी सेंद्रिय खतांसोबत जीवामृत चा वापर केला व त्यामुळे मातीची सुपीकता वाढण्यास देखील मदत झाली.
किती मिळत आहे उत्पादन?
ड्रॅगन फ्रुटला जून महिन्याच्या अखेरीस फुलोरा येतो व जुलै महिन्यात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर हा उत्पादनाचा कालावधी असतो. या कालावधीत सुमारे सात तोडे होतात. ड्रॅगन फ्रुटचे साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून चांगले उत्पादन मिळायला लागते.
प्रत्येक खांब उत्पादन पाहिले तर ते दहा ते वीस आणि कमाल 30 किलो पर्यंत मिळते. यामध्ये एक वानाचे फळाचे वजन 200 ते 500 ग्रॅम पर्यंत भरते तर जम्बो वाणाचे एका फळाचे वजन 400 ते 900 ग्रॅम दरम्यान भरते. एकरी त्यांना 13 ते 14 टन इतके उत्पादन सध्या मिळत आहे.
ते ड्रॅगन फ्रुट विक्रीकरिता सुरत, वाशी आणि जवळ असलेल्या नाशिकला पाठवतात. प्रति किलो त्यांना 90 ते 100 रुपयांपासून ते 220 ते 250 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला आहे.श्रीराम ड्रॅगन फ्रुट फार्म या नावाने त्यांनी बाजारपेठेत स्वतःची ओळख तयार केली आहे.
अशा पद्धतीने चव्हाण दांपत्याने आधुनिकतेची कास धरत ड्रॅगन फ्रुट लागवडीतून स्वतःचे घर आणि वाहनांचे स्वप्न देखील पूर्ण केले आहे. त्यामुळे जर कष्टाला आधुनिकतेची जोड दिली तर शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर होऊ शकते हे सिद्ध होते.