Crop Insurance : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याच संरक्षण लाभत.
यासाठी त्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. दरम्यान आता खरीप हंगामातील पिक विमा बाबत एक महत्त्वाची माहिती कृषिमंत्र्यांनी सार्वजनिक केली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यातील विविध पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
447 कोटी रुपये मात्र अजूनही प्रलंबित असून लवकरच ही रक्कम देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाणार आहे. यासाठी कृषिमंत्र्यांनी संबंधित पिक विमा कंपन्यांना निर्देशित केले आहे. कृषिमंत्री गुरुवारी मंत्रालयात पिक विमा बाबत आढावा बैठक घेत होते, त्यावेळी त्यांनी या विषयी माहिती दिली.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणे पश्चात झालेला नुकसान या बाबी अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपन्यांकडे सूचना दिल्या होत्या. या प्राप्त झालेल्या सूचनेचे सर्वेक्षण किंवा पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाईची रक्कम मिळाली आहे.
पिक विमा खरीप 2022 अंतर्गत आतापर्यंत 57 लाख 91,167 इतकी लाभार्थी संख्या बनली आहे. यासाठी नुकसान भरपाई 2,413 कोटी 69 लाख रुपये निश्चित झाली आहे. यापैकी आतापर्यंत 43 लाख 86 हजार 763 शेतकऱ्यांना एकूण 1,966 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
दरम्यान उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करा, तसेच पिक विमा काढलेला एकही नुकसानग्रस्त शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. अशा सूचना यावेळी कृषिमंत्री सत्तार यांनी पिक विमा कंपन्यांना दिल्या आहेत.
या बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी आणि राज्यातील पिक विमा कंपन्यांचे अधिकारी देखील हजर होते. निश्चितचं उर्वरित शेतकऱ्यांना देखील आता लवकरच पिक विमा नुकसान भरपाई मिळणार असल्याचे चित्र आहे.