Corn Crop Variety :- रब्बी हंगामातील प्रमुख पिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर मका हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच मक्याचे बाजार भाव जर पाहिले तर सध्या 1500 ते 2000 च्या आसपास असून पोल्ट्री तसेच पशुखाद्य उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर मक्याचा वापर केला जातो व त्यामुळे बाजारपेठेत देखील मक्याची मागणी वाढताना आपल्याला दिसून येते.
या अनुषंगाने मका लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.तसेच इतर पिकांच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर मक्यासाठी येणारा खर्च हा कमी असतो. योग्य व्यवस्थापन जर ठेवले तर एकरी मक्याचे चांगले उत्पादन घेऊन कमी खर्चात देखील चांगले आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवणे या पिकाच्या माध्यमातून शक्य आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही पिकापासून जर आपल्याला चांगले उत्पादन हवे असेल तर त्यासाठी पिकाच्या सुधारित वाणाची लागवडीसाठी निवड करणे खूप गरजेचे असते. पिकाचे वाण दर्जेदार किंवा उत्पादनक्षम नसतील तर तुम्ही कितीही व्यवस्थापन ठेवले तरी देखील उत्पादनाला फटका बसतोच. त्यामुळे सुधारित वाणांची निवड खूप महत्त्वाचे ठरते. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण रबी हंगामात मका लागवड जर करायची असेल तर काही महत्त्वाच्या वाणांची माहिती थोडक्यात घेऊ.

रब्बी हंगामात मक्याच्या या सुधारित जाती देतील बंपर उत्पादन
1- मांजरी- मक्याचा हा वाण रब्बी हंगामासाठी लागवडीकरिता खूप उपयुक्त असून लागवड केल्यानंतर साधारणपणे 90 ते 110 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. उत्पादनामध्ये देखील हा वाण चांगला असून हेक्टरी 40 ते 50 क्विंटल इतके उत्पादन मिळू शकते.
2- राजश्री- महाराष्ट्र मधील ही एक मक्याची प्रमुख संकरित जात असून रब्बी हंगामामध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे. लागवड केल्यानंतर साधारणपणे 100 ते 110 दिवसात काढणीस तयार होतो. मक्याची ही संकरित जात असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन या जातीच्या लागवडीतून मिळू शकते. हेक्टरी उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर 55 ते 60 क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या जातीत आहे.
3- करवीर- महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये करवीर जातीच्या मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. लागवडीनंतर साधारणपणे 100 ते 110 दिवसांमध्ये या जातीचा मका पक्व होतो. करवीर जातीच्या मका लागवडीतून हेक्टरी 40 ते 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
4- डेक्कन- मक्याची ही सुधारित जात देखील उत्पादनाच्या बाबतीत चांगली असून मक्याचा हा संकरित वाण आहे व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये लागवडीस प्रसिद्ध आहे. साधारणपणे 105 ते 110 दिवसात काढणीस तयार होतो व त्यापासून मिळणारे उत्पादन हेक्टरी 55 ते 60 क्विंटल पर्यंत आहे.