अनुदान न मिळाल्यामुळे आता ‘या’ तालुक्यातील शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात

अहमदनगर :कर्जत तालुक्यातील मिरजगाव मंडलात सन २०२२/२३ मध्ये सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते; परंतु हे अनुदान मिरजगाव येथील काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही. नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान काही गावांतील शेतकऱ्यांना मिळाले.

मात्र, मिरजगावातील शेतकरी नुकसानीचे पंचनामे होऊनदेखील अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर दिले जात नाही. रखडलेले अनुदान तत्काळ वितरीत न झाल्यास येथील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा पावसाने या भागात दडी मारल्याने हा भाग दुष्काळ सदृश्य जाहीर झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांना दुष्काळातही अनुदान मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अनुदान केव्हा मिळेल, याची वाट पाहत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती.

या अतिवृष्टीत खरीप पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय जमिनीही खरडून गेल्या होत्या. यात सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून घोषणांचा पाऊस झाला. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. मिरजगाव हे कर्जत जामखेड मतदारसंघातील गाव असून, या भागात दोन आमदार व एक खासदार असूनही शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe