Farmer Success Story : शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय. शेतीमधून फक्त पोट भरता येऊ शकते, यातून आर्थिक प्रगती करणे अशक्य असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. गेल्या काही वर्षांमध्ये नक्कीच शेती व्यवसायाला विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. नैसर्गिक संकटांमुळे तसेच शासनाच्या विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.
मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीत देखील राज्यातील काही शेतकरी बांधव शेतीमधून लाखो रुपयांची कमाई काढत आहेत. शेतकरी बांधव आता फक्त पारंपारिक शेतीवर अवलंबून राहिलेले नाहीत, ते आता पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत आहेत.

तसेच यातून त्यांना चांगले उत्पादन सुद्धा मिळत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पण असाच एक आधुनिक प्रयोग शेतीमध्ये राबवून लाखो रुपयांची कमाई काढली आहे.
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील शेतकरी मनोज गोणटे यांनी फक्त 14 महिन्यांच्या काळात तीस गुंठे जमिनीतून साडेचार लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण तालुकाभर चर्चा आहे.
मनोज यांनी सांगितले की त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीवर आधीपासून सोयाबीन मका तूर अशा पारंपारिक पिकांची शेती केली जात होती. पण पारंपारिक पिकांमध्ये खर्च जास्त आणि कमाई कमी निघायची.
यामुळे मनोज यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देऊन आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आठ क्विंटल आल्याची बियाणे खरेदी केले आणि याची 30 गुंठे जमिनीत लागवड केली.
माहीम जातीचे बियाणे त्यांनी आपल्या शेतात लावले. गेल्या वर्षी त्यांनी आल्याची लागवड केली. लागवडीनंतर बेसल डोस, शेणखत आणि जैविक औषधांचा मनोज यांनी योग्य पद्धतीने वापर केला. या पिकासाठी त्यांनी साडेचार लाख रुपयांचा खर्च केला.
यातून त्यांना 280 क्विंटल आल्याचे उत्पादन मिळाले. 14 महिन्यांनी उत्पादन त्यांच्या हातात आले पण त्यावेळी बाजारात आल्याचे दर पडले. यामुळे त्यांच्या चिंतेत अधिक भर पडली. पण त्यांनी खचून न जाता आल्याची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा दर वाढतील तेव्हा आपण याची विक्री करू असे ठरवले.
दरम्यान मध्यंतरी आल्याचे रेट वाढलेत आणि त्यांनी आपला माल विकण्याचा निर्णय घेतला. मनोज यांच्या उत्पादनाला चाळीस रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. त्यांना आले विक्रीतून नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा केला असता त्यांना 30 गुंठ्यातून साडेचार लाख रुपये निव्वळ नफा मिळाला.