जुलै-ऑगस्ट महिन्यात खरीप हंगाम पूर्ण जोरात सुरू असतो. याच काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात कांदा लागवडीसाठी सज्ज होतात. खरीप हंगामात विशेषतः लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. काही शेतकरी थेट बियाण्यांची पेरणी करतात, तर काहीजण रोपे तयार करून लागवड करतात. भरघोस आणि दर्जेदार कांदा उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, वेळेवर लागवड, संतुलित खते, आंतरमशागत आणि कीड-रोग व्यवस्थापन यांचे काटेकोर पालन गरजेचे असते.
योग्य वाण आणि लागवडीचा कालावधी
खरीप (जुलै-ऑगस्ट), रांगडा (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि रब्बी/उन्हाळी (नोव्हेंबर-डिसेंबर) या तिन्ही हंगामांमध्ये शेतकऱ्यांनी सुधारित कांदा वाणांचा वापर करावा. लागवडीसाठी बियाण्याचे प्रमाण प्रति हेक्टर ८ ते १० किलो इतके असावे. लागवडीचे अंतर सर्व हंगामांमध्ये १५ x ७ x १० सेमी राखावे, जेणेकरून कांद्याला आवश्यक जागा आणि पोषण मिळेल.

खत व्यवस्थापन आणि अन्नद्रव्ये पूर्तता
सेंद्रिय खत म्हणून प्रति हेक्टर २५ ते ३० टन शेणखत लागवडीपूर्वी १५ दिवस आधी जमिनीत मिसळावे. रासायनिक खतांमध्ये नत्र १०० किलो, स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात वापरावे. नत्र अर्ध्या प्रमाणात लागवडीच्या वेळी आणि उर्वरित दोन समान हप्त्यांमध्ये ३० व ४५ दिवसांनी देणे उपयुक्त ठरते. पेरणीपूर्वी बियाण्यास अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम प्रमाणात चोळावे.
रब्बी हंगामासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस आधी ४५ किलो गंधक (जिप्सम स्वरूपात) जमिनीत मिसळणे फायदेशीर ठरते.
आंतरमशागत व तण नियंत्रणाचे उपाय
खरीप कांदा लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी वरखत द्यावी. तण नियंत्रणासाठी ऑक्झीफ्लोरफेन २३.५% ई.सी. (७.५ मि.ली.) आणि क्युझोलफॉप ईथाईल ५% ई.सी. (१० मि.ली.) या तणनाशकांची १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. लागवडीनंतर २५ दिवसांनी फवारणी करून ४५ व्या दिवशी पुन्हा एक खुरपणी करावी.
किड व रोग नियंत्रणासाठी फवारणीचे नियोजन
फुलकिडे कांद्याच्या पानांवर चट्टे पाडून रस शोषतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३०% ई.सी. (१५ मि.ली.) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. (६ मि.ली.) हे किटकनाशक १० लिटर पाण्यातून फवारावे. आलटून-पालटून फवारणी केल्यास चांगला परिणाम मिळतो. ५% निंबोळी अर्काची फवारणी आणि चिकट द्रव्याचा (०.१%) वापर केल्यास नियंत्रण अधिक प्रभावी होते.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायफेनकोनॅझोल, टेब्युकोनॅझोल, अॅझोक्सिस्ट्रोबीन यासारख्या बुरशीनाशकांचा वापर करावा. हे बुरशीनाशक १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावेत.
हंगामानुसार अपेक्षित उत्पादन
खरीप हंगामात सरासरी उत्पादन १०० ते १५० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. रांगडा हंगामात हे उत्पादन २०० ते २५० क्विंटल, तर रब्बी व उन्हाळी हंगामात २५० ते ३५० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत वाढते. हंगामाचा, हवामानाचा आणि पद्धतीचा योग्य विचार केल्यास उत्पादनात सातत्य व नफा अधिक मिळवता येतो.