२४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : संगमनेर तालुक्यातलया पठार भागातील काटवनवाडीतील १५ आदिवासी शेतकऱ्यांनी दुष्काळी भागातल्या शेतीला पुर्नजीवन देण्याच्या हेतूने ‘आदिवासी एकता शेतकरी गट’ स्थापन करून या गटाने ‘पाणी फाउंडेशन फार्मर कप’ स्पर्धेत सेंद्रिय शेतीच्या जोरावर एक लाखाचे पारितोषिक जिंकून तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
पारितोषीक जिंकल्यावर बक्षिसाची रक्कम त्यांनी वाटून न घेता त्या पैशाने अंजिराची शेती करण्याचे ठरवले.त्यांच्या या निर्णयाचा आजमितीला खूप फायदा होत असून काटवनवाडीमध्ये अंजिराच्या बागा फुलल्या असल्याचे बघायला मिळत आहे.या शेतीमधून या शेतकऱ्यांना लाखों रुपयांचे उत्पन्न मिळून फायदा होणार आहे.

या शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये सोयाबीनची सेंद्रिय शेती केली होती त्यातून त्यांनी भरघोस उत्पादन घेतले.त्याबद्दल त्यांना एक लाख रुपये बक्षीस सुद्धा मिळाले होते. पण त्यांनी ही रक्कम खर्च केली नाही परंतु त्यांनी कायम स्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उभा होण्यासाठी अंजिर शेती करण्याचा मार्ग निवडला.
एकात्मिक फलोत्पादन विकास योजने बद्दल त्यांनी माहिती घेऊन त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी पारंपरिक शेतीत नवीन प्रयोग केला.काटवनवाडी भागात उन्हाळ्यात भयंकर दुष्काळ पडत असतो.उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते आणि प्रतिकूल हवामानामुळे शेती करणे या ठिकाणी कठीण होऊन जाते.
पण या शेतकऱ्यांनी ‘शेडनेट शेती’चा पर्याय निवडून शासनाच्या अर्थसहाय्य योजनेतून मदत मिळवली आणि १५ शेतकऱ्यांनी मिळून साडेसात एकर जमिनीत शेडनेट तयार केले.त्यामुळे अंजिराच्या रोपांना अनुकूल वातावरण मिळून त्यांची जोमदार वाढ होऊ लागली.त्यांना स्पर्धेत मिळालेल्या एक लाख रुपयांवर त्यांनी २५ हजार रुपये अजून गुंतवून पुण्यातील पुरंदर येथून ‘जंबो’ जातीच्या १९५६ अंजिराच्या रोपांची खरेदी केली.
आज हि रोपे पाच ते सहा फूट उंच वाढ झाली असून त्यांना फळे सुद्धा लागली आहेत.तीन महिन्यांत त्याची हार्वेस्टिंग सुरू होईल.या अंजिराला प्रती किलो ८० ते ९० रुपये भाव मिळेल अशी अशा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला लाखोंचा नफा मिळेल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. दुसऱ्या हार्वेस्टिंग पासून जॅम, जेली, ड्रायफ्रूट्स आणि इतर फूड प्रोडक्ट्स तयार करावे अशी त्यांची प्लॅनिंग आहे.
भीमा उघडे यांच्या नेतृत्वाखाली १५ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दर महिन्याला २०० रुपये बचत करण्याची योजना सुरू केली.आता ते सर्वजण मिळून एकाच प्रकारची शेती करण्यावर भर देत आहेत.उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत काटवनवाडीतील आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीत नवीन प्रयोग केले.
यशस्वी शेती कशी करता येते, याचे उत्तम उदाहरण त्यांनी बाकी शेतकऱ्यांना घालून दिले.एकत्र येऊन संकटांवर मात केल्यावर दुष्काळसुद्धा काहीही करू शकत नाही हे त्यांनी सिद्ध केल आहे. ‘पाणी फाउंडेशन’च्या स्पर्धेतील पारितोषिक हा या परिवर्तनाचा प्रारंभबिंदू ठरला.हे आदिवासी शेतकरी उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत,असे आदिवासी शेतकरी एकता गटाचे अध्यक्ष भीमा उघडे यांनी सांगितले.
आदिवासी शेतकऱ्यांना बळ देणारा पॅटर्न : महाले
संगमनेर तालुक्यातील काटवनवाडीतील आदिवासींच्या समुह शेतीतून अंजीर शेतीचा प्रयोग राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.पठार भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली अंजीर शेती त्यांच्या आर्थिक प्रगतीला बळ देणारा नवा पॅटर्न काटवनवाडील आदिवासी शेतकऱ्यांनी दिला आहे, असे रवींद्र महाले यांनी सांगितले.