२३ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : आंतरपीक लागवड, त्यातून मिळालेल्या उत्पादनातून शेतकऱ्यांचा ऊस लागवडीचा प्राथमिक खर्च निघतो. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी काही प्रमाणात हे आंतरपीक निघाल्यानंतर आर्थिक मदत होते.
तसेच द्विदल आंतरपीक घेतल्यानंतर जमिनीचा पोत सुधारतो, त्यामुळे अनेक शेतकरी पूर्वहंगामी उसामध्ये आंतरपीक घेतात. उसाची चांगली वाढ होईपर्यंत कांदा, गहू, भुईमूग, हरभरा, कोथिबीर ही पिके कमी कालावधीत निघणारी आहेत. त्यामुळे ऊस लागवड होऊन उगवण होईपर्यंत व ऊस मशागतीला येईपर्यंत ही पिके काढता येतात.
द्विदल आंतरपिकांमुळे जमिनीचा पोत सुधारला जातो. त्यामुळे शेतकरी द्विदल धान्य पीक आंतरपीक म्हणून घेतात. शिवाय, कांदा लसूण यांचे वाढलेले दर पाहता. कांदा लागवड जास्त प्रमाणात झालेली दिसत आहे. उसामध्ये आंतरपीक घेतल्याने काही फायदे व काही तोटे सुद्धा आहेत. उसाला आंतरपीक असताना पाणी, खते व औषधे जास्त लागत असतात. याशिवाय खुरपणीशिवाय मशागती करता येत नाही.
उसाची वाढ व फुटव्यावरसुद्धा आंतरपिकाचा परिणाम होतो. आंतरपिके काढल्यानंतर पाणी वेळेच्या वेळी द्यावे लागते. नाहीतर ऊस उत्पादनावर परिणाम होतो. उत्पादन कमी मिळते,असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.आंतरपीक लागवडीला उशीर होईल, तस तसे अनेक शेतकरी आंतरपीक घेत नाहीत. उशिरा लागवड केलेल्या आंतर पिकामुळे उसासाठी पाणी मशागतीसाठी खूप वेळ व अडचणी होऊ शकते. तेव्हा सर्वसाधारण पूर्व हंगामामध्ये उसात आंतरपिके घेण्याकडे शहरटाकळी, मठाचीवाडी, दहिगावने, भावीनिमगाव, देवटाकळी, मजलेशहर, ढोरसडे – अंत्रे जोहरापूर, भातकुडगांव, हिंगणगावसह परिसरातील शेत शिवारामध्ये पहावयास मिळत आहे.
यंदा झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात पूर्व हंगामी उसाची लागवड करीत आहेत. यावर्षी शेतकरी पूर्वहंगामी उसामध्ये भुईमूग, हरभरा, कांदा, गहू, लसूण, कोथिंबीर, या सारखी आंतरपिके घेण्यावर भर देताना दिसत आहेत.
कमी कालावधीत ऊस मशागतीपर्यंत निघणारी व ऊस पिकाला पोषक असणारी आंतरपिके नेहमी घेतो.आंतरपिकांमुळे उसाच्या खर्चात बचत होत असते. ऊस शेती उत्पादनात आंतरपिकांची भर पडते -बाबासाहेब पाचगुडे, मठाचीवाडी.