खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या तयारीत बीजप्रक्रिया हा एक महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा आहे, जो पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी आधारस्तंभ मानला जातो. मात्र, अनेक शेतकरी अद्याप या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्यांच्या पिकांच्या उगवणक्षमतेत आणि उत्पादनात घट होते.
योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवणक्षमता वाढते, बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांपासून संरक्षण मिळते आणि पिकांची वाढ सशक्त होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि योग्य पद्धतींची माहिती देत, कमी खर्चात अधिक फायदा मिळवण्याचे आवाहन केले आहे.

बिजप्रक्रिया का करावी?
बीजप्रक्रिया ही शेतीतील यशस्वी उत्पादनाची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. योग्य बियाण्यांची निवड आणि त्यावर थायरम, मॅन्कोझेब, कॅप्टन किंवा ट्रायकोडर्मा यांसारख्या बुरशीनाशकांची प्रक्रिया केल्यास बियाण्यांना रोगांपासून सुरक्षितता मिळते. अॅझोटोबॅक्टरसारखे जैविक खत नत्र स्थिरीकरणास मदत करते आणि पिकाची वाढ सुधारते. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवणे आवश्यक आहे, कारण थेट सूर्यप्रकाशात वाळवल्यास बियाण्यांची उगवणक्षमता कमी होऊ शकते. तसेच, बियाणे कोरड्या, स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी साठवावे आणि प्रक्रियेनंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी. अशा काळजीमुळे बियाण्यांना सुरुवातीपासूनच रोगांपासून संरक्षण मिळते, उगम सुधारतो आणि रोपे सशक्त वाढतात, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते.
बियाण्यांची निवड करताना काळजी घ्या
बियाण्यांची निवड करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पाण्यात भिजवून तपासणी केल्यास खराब आणि कमकुवत बियाणे पाण्यावर तरंगतात, तर चांगली बियाणे पाण्यात बुडतात. पाण्यावर तरंगणारी बियाणे पेरणीकरिता अयोग्य असतात, कारण त्यांची उगवणक्षमता कमी असते. त्यामुळे अशा बियाण्यांची निवड टाळावी. तसेच, बियाणे आणि खते खरेदी करताना पावती जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. बोगस बियाणे किंवा खते आढळल्यास तक्रार करताना आणि शासकीय भरपाई योजनेसाठी पावती हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. बियाण्यांची पिशवी, वेष्टन किंवा थोडेसे बियाणे पिकाच्या कापणीपर्यंत जपून ठेवावे, जेणेकरून कायदेशीर कारवाईसाठी पुरावे उपलब्ध राहतील. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान टाळता येईल.
बीजप्रक्रियेचा फायदा
बीजप्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पिकाची उगवणक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांपासून सुरुवातीपासूनच संरक्षण मिळाल्याने पिकांचा उगम चांगला होतो आणि रोपे सशक्त होतात. यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, आणि कमी खर्चात अधिक नफा मिळतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा म्हणून बीजप्रक्रिया महत्त्वाची मानली जाते.
शेतकऱ्यांना खरीप हंगामात यश मिळवायचे असेल, तर बीजप्रक्रियेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी शेतकऱ्यांना योग्य बियाण्यांची निवड, प्रक्रिया आणि साठवणूक याबाबत सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. ही प्रक्रिया अवलंबल्यास शेतकरी कमी खर्चात मालामाल होऊ शकतात आणि पिकांचे नुकसान टाळू शकतात.













