शिर्डी- राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले पीक सुरक्षित करावे असे आवाहन तहसीलदार अमोल मोरे व तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी केले आहे.
राहाता तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे. नैसर्गिक आपत्ती व रोगराईपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासन संयुक्तपणे प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवत आहे. भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी शेतकऱ्यांना अंतिम दिनांक ३१ जुलै निश्चित करण्यात आली आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार, बँक पासबुक, स्वयंघोषणापत्र व अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकासह अर्ज करून हप्ता भरावा. सीएससी केंद्रांमार्फतही अर्ज सादर करता येईल. अर्जानंतर इ-पीक पाहणी नोंदणी अनिवार्य आहे.
अधिसूचित पिकांसाठी संरक्षित रक्कम व शेतकरी हप्ता पुढीलप्रमाणे : बाजरीसाठी प्रति हेक्टर संरक्षित रक्कम रु. ३२,६४० असून शेतकरी हप्ता रु. ६४० आहे. मक्यासाठी संरक्षित रक्कम रु ३६,००० व हप्ता रु. ३६० आहे. सोयाबीनसाठी संरक्षित रक्कम रु. ५८,००० व हप्ता रु.१,१६० आहे. भुईमूगसाठी संरक्षित रक्कम रु.४५,००० असून हप्ता रु. ११२.५० आहे. तुरीसाठी संरक्षित रक्कम रु. ४७,००० व हप्ता रु. ९४० आहे. कापसासाठी संरक्षित रक्कम रु.६०,००० असून हप्ता रु. १,८०० आहे. तसेच कांद्यासाठी संरक्षित रक्कम रु. ६८,००० व हप्ता रु. ५१० निश्चित करण्यात आला आहे.
चुकीची माहिती दिल्यास पुढील पाच वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी १४४४७हेल्पलाईनवर किंवा गावातील सहायक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. अंतिम तारखेची वाट न पाहता शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.