भंडारदरा परिसरात शेतकरी संकटात ! भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी एका मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा परिसर म्हणजे भाताचे आगार समजले जाते. यावर्षी मात्र या भाताच्या आगारातच केवळ एका मोठ्या पावसाच्या अभावी भातपिक धोक्यात आले आहे. यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाची म्हणावी अशी मेहरबानी झाली नाही.

त्याही परिस्थितीत पडत असलेल्या पावसाच्या जोरावर भंडारदरा पाणलोटात भाताचे पीक जोमाने आले होते. शेतकऱ्यांच्या हातामध्ये भातपिक येईपर्यंत भातशेतीला पाण्याची आवश्यकता असते.

यावेळी पावसाने शेवटी शेवटी दगा दिला असून गणपतीत पाऊस पडल्यानंतर परत पावसाने फिरकण्याचे नावच घेतले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातखाचरातील पाणी संपुष्टात आले.

अनेक शेतकऱ्यांची पोटरीत आलेले भातपिके पाण्याअभावी करपु लागली आहेत, तर काही पिवळी पडू लागली आहेत. दरवर्षी परतीच्या पावसावर आदिवासी बांधवांचे भातपिक १०० टक्के येत असते;

मात्र गणपतीनंतर नवरात्रातीत परतीचा पाऊस भंडारदरा पाणलोटासह परिसरात पडलेला नसल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावुन घेतल्यात जमा झाला आहे.

आणखी तीन ते चार दिवस पाऊस जर पडला नाही, तर परिसरातील सर्व भातपिके पाण्याअभावी जळणार आहेत. आदिवासी शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

भाताची पिके घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, कोलटेंभे, लव्हाळवाडी, शिंगणवाडी, मुरशेत, पांजरे, शेंडी, बारी, वारघुंशी या भागातून करपू लागली असुन कोलटेंभे येथील सरपंच एकनाथ सारोक्ते व वाकीचे माजी सरपंच धीरज सगभोर यांनी बाधित शेतपिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe