Ahmednagar News : मागील दोन वर्षे पावसाने तालुक्यात जोरदार बॅटिंग केली होती; परंतु यावर्षी जुलै महिना सुरू झाला तरीदेखील कुठेही पेरणीयुक्त पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून,
पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. मुंबईसारख्या ठिकाणी पाऊस सुरू असल्याने ग्रामीण भागात वारे वाहत आहेत. मुंबईतला पाऊस थांबल्यानंतर ग्रामीण भागात पावसाला सुरुवात होईल, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
असे असले तरी यावर्षी समाधानकारक पावसाबाबत शेतकरी अजूनही चिंतित असून, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटून येऊ लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मिरी, तिसगाव,
करंजी, कोल्हार, चिचोंडी, शिराळ, दगडवाडी, भोसे, वैजूबाभळगाव, लोहसर, खांडगाव, घाटशिरस, कौडगाव, देवराई, निंबोडी, मांडवे, जोडमोहजसह तालुक्याच्या पश्चिम भागात आद्यपही पेरणीयुक्त पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा मूग आणि उडीद पेरणीचा मुहूर्त हुकला असून,
कपाशी, बाजरीच्या पेरणीलाही मुहूर्त कधी मिळणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जुलै सुरू झाला तरीदेखील पावसाचे कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही, पाऊस वेळेवर न झाल्यास पेरण्या आणखी लांबतील,
त्यामुळे पेरणीयुक्त पावसाचे कधी पडेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जुलै महिना सुरू झाला तरीदेखील पाऊस न झाल्याने मूग व उडीद पेरणीचा मुहूर्त हुकला असून, तूर, बाजरी पेरणी बाबतदेखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.