श्रीरामपूर- शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करत संघटनेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रार अर्ज**
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज जगताप यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला. या तक्रारीत जगताप यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याचं नमूद केलं. “गेल्या १५ वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारने शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल असा भाव मिळवून दिला नाही. शेतीच्या विरोधी धोरणांमुळे आम्ही कर्ज फेडू शकत नाही. शेती तोट्यात विकावी लागत असल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली आहे,” असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तक्रार अर्जाची दखल घेऊन कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

कर्ज न फेडण्याचे आवाहन
पतसंस्था, फायनान्स कंपन्या, सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा बँकांचं कर्ज शेतकऱ्यांच्या माथी आहे. “शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आणि शेतीला कोणतंही संरक्षण नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत आहे,” असं अॅड. अजित काळे यांनी सांगितलं. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत कर्ज न फेडण्याचं आवाहन केलं आहे. “शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढत राहू,” असं काळे यांनी ठामपणे सांगितलं.
पोलिसांचा प्रतिसाद
शेतकरी संघटनेने सादर केलेला तक्रार अर्ज आयपीएस अधिकारी रॉबिन बंसल यांच्याकडे देण्यात आला. या वेळी अॅड. अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, साहेबराव चोरमल, अॅड. सर्जेराव घोडे, नरेंद्र काळे, संतोष पठारे, सुजित बोडखे, बाळासाहेब आसने, सुनील आसने, अॅड. प्रशांत कापसे, राजेंद्र लांडगे, बाबासाहेब वेताळ, सचिन वेताळ, बापूसाहेब गोरे, अभिषेक वेताळ, राहुल कापसे, महेश आघाडे, दीपक धिरडे, बबनराव नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तक्रारीबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं, “शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारं निवेदन मिळालं आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकरी संघटनेने आपल्या तक्रारीत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन देणाऱ्या सरकारने सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाकडे पाठ फिरवल्याचा दावा संघटनेने केला. “खोटी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. ही केवळ राजकीय चाल होती,” असं युवराज जगताप यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या या फसवणुकीला जबाबदार असलेल्या मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
*शेतकऱ्यांचा आक्रोश*
“शेती तोट्यात आहे, कर्ज वाढत आहे, आणि सरकार फक्त आश्वासनं देतं. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे,” असं एका शेतकरी कार्यकर्त्याने सांगितलं. शेतकरी संघटनेने कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आंदोलनाची तयारी दर्शवली आहे. “जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा अॅड. अजित काळे यांनी दिला.
लढा तिव्र करण्याचा इशारा
“हा फक्त तक्रारीचा अर्ज नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आहे,” असं अनिल औताडे यांनी सांगितलं. कर्जमुक्तीच्या आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या सरकारविरुद्ध कायदेशीर आणि राजकीय लढा तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.