Agriculture News : देशातील अग्रगण्य रासायनिक खत तयार करणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पार कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच विविध संकटांनी पिचून निघालेल्या बळीराजासाठी ही दरवाढ चिंतेचा विषय ठरला आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. दुसरीकडे शेतीत भरमसाठ खर्च केल्यानंतर उत्पादित होणाऱ्या शेतमालाला बाजारपेठेत मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे दिवसेंदिवस शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत.
रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या किमती वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावरच झालेली खत दरवाढ पाहून आर्थिक गणित जुळवताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. भाववाढ करून सरकारला शेतकऱ्यांचे दुपट उत्पन्न करायचे आहे की खर्च ?
असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. शेतीसाठी लागणारी रासायनिक खते, औषधी, बियाणे आदिंच्या किमती दरवर्षी वाढत आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे शेतातील मशागतीची कामेही महागली असल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा होत आहे.
भरमसाठ खर्च करूनही शेतमालाला बाजारपेठेत मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. हंगाम तोंडावर आलेला असताना खतांच्या किमती वाढवल्या आहेत. भाववाढीमुळे खर्चाचे गणित जुळवताना शेतकऱ्यांच्या नाकी नव येत आहेत