अहिल्यानगर : नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहीले जाते यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा पीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मार्च महिन्याच्या सुरुवातीस कांद्याला सरासरी २५००ते ३००० रूपये भाव मिळत होता. परंतु मार्च महिन्यात कांद्याची काढणी सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक वाढताच कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत ती थेट ४०० ते १३०० रूपयांवर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आले आहे. परिणामी चार अन्याची कोंबडी अन बारा अन्याचा मसाला अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे.
मागील वर्षी कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस प्राधान्य दिले. परंतु हवामान झालेल्या बदलाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सुरूवातीच्या काळात कडाक्याची थंडी व त्यापाठोपाठ दाट धुक्यामुळे आर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे कांदा रोप वाया गेले. मात्र बाजाराम मिळत असलेले चांगले भाव पाीता शेतकऱ्यांनी परत एकदा नवीन रोप टाकून कांदा लावगड केली. यंदा कांदा लावडीसाठी रोजंदरीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ केली.

त्यापाठोपाठ खते व औषधांचे देखील दरवाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे बजेट आधीच कोलमडले होते मात्र कांदा विक्रीतून दोन पैसे मिळतील या भाबड्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी प्रसंगी चढ्या किमतीने रोपे घेवून कांदा लागवड केली. मार्च महिन्याच्या सुरूवाती पर्यंत सर्वकाही अलबेल होते. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू होताच दरात घसरण सुरु झाली. ही घसरण पाहता शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणीच आले आहे. महागाईत कांद्याचे रोपे लागवड, मशागत, मजुरी, औषध फवारणी या खर्चाचा विचार केल्यास हातातोंडाशी आलेले चांगले कांद्याचे पीक कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतातून काढलेला कांदा विक्री करण्याशिवाय अनेक शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. मात्र कांदा लागवडी पासून काढणी पर्यंत येणाऱ्या खर्चाचा विचार करता सध्या कांद्याला मिळणारा दर हा नुकसानकारक आहे.
दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे कांदा लागवडीसाठीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांद्याच्या वायद्यावर अनेकांकडून रक्कम कर्जाऊ घेतल्याने आता त्यांचे कर्ज कसे द्यायचे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
सरासरी भाव ४०० ते १७००
सोमवारी नेप्ती उपबाजार समितीत ५० हजार ३९९ गोण्या गावरान कांद्याची आवक झाली होती.यात १ नंबर कांद्यास १४५० ते १७००,२ नंबर ९५० ते १४५०, ३ नंबर ६५० ते ९५०, ४ नंबर ४०० ते ६५० म्हणजेच सरासरी ४०० ते १७०० असा दर मिळाला.