Goat Rearing:- शेळीपालन हा कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेमध्ये करता येणारा व्यवसाय असून एकूण गुंतवणुकीच्या मानाने यापासून मिळणारा नफा हा चांगला असतो व त्यामुळेच आता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण शेळीपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूप काळजी घेणे गरजेचे असते.
यामध्ये आहार व्यवस्थापनाला महत्त्व तर आहेच परंतु त्यासोबत आरोग्य व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. तसेच तुमचा शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर तुम्हाला वाढवायचा असेल तर शेळ्यांचा प्रजनन काळामध्ये घेतली जाणारी काळजी ही खूप महत्त्वाची असते
त्यासोबतच शेळ्यांचा गाभण काळ हा प्रजनन काळाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असल्याने वेळेवर तुम्हाला शेळीला गाभण आहे की नाही हे ओळखता येणे देखील तितकेच गरजेचे असते. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण शेळी गाभण आहे की नाही? हे कसे ओळखावे याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
शेळी गाभण आहे की नाही अशा पद्धतीने ओळखा
साधारणपणे आपण जर पाहिले तर शेळी आणि मेंढी यांची गर्भधारणा आणि गाभण काळ हा बहुतांशी सारखाच असतो. साधारणपणे 150 दिवसांचा गाभण काळ असतो व वसंत ऋतूमध्ये ते करडांना जन्म देतात. तसेच शेळ्यांच्या अनेक जाती असून प्रत्येक जातीचा गाभण काळ वेगवेगळा असू शकतो.
परंतु शेळी गाभण आहे की नाही यासाठी अनुभवाची देखील तितकीच गरज असते. त्यामुळे बरेच शेतकरी बंधू पशुवैद्यक यांचा यासाठी आधार घेत असतात. परंतु वेळेमध्ये जर तुम्ही तुमच्या शेड मधील शेळी गाभण आहे की नाही हे ओळखू शकला तर त्या संबंधीचे योग्य नियोजन तुम्हाला करता येते.
यामध्ये जर तुम्ही हाताने शेळीचे पोट तपासून देखील यासंबंधीचा अंदाज लावू शकतात. जेव्हा तुम्ही शेळीच्या पोटाला स्पर्श कराल आणि शेळीचे पोट इतर सामान्य शेळीपेक्षा तुम्हाला वेगळे वाटते का? यामध्ये तपासणी गरजेचे आहे. याकरिता तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाने हळुवारपणे शेळीच्या कासेच्या थोडे समोर दाब द्यावा आणि त्यानंतर काही जाणवते का याचे निरीक्षण करावे. साधारणपणे गाभण शेळीचे पोट इतर शेळ्यांच्या पोटापेक्षा थोडे कडक असल्याचे जाणवते.
ते कडक आहे की नाही हे तपासून पहावे. शेळीला गर्भधारणा होऊन जर साडेतीन महिने झालेले असतील तर या कालावधी दरम्यान शेळीच्या कासेचा समोरील भाग दाबून देखील तुम्ही गर्भाच्या हालचाली तपासू शकतात. तसेच गाभण असलेल्या शेळीची पचनक्रिया वाढलेली असते व ती शेळी नेहमीपेक्षा आहार जास्त खाते व शांत शांत राहते. 12 हप्त्यानंतर तिचे पोट सुजल्यासारखे वाटते. यामध्ये काही शेळ्यांचे पोट गोलाकार आकाराचे दिसते.
अशा पद्धतीने तुम्ही जर शेळ्यांच्या पोटाचे निरीक्षण केले तर शेळी गाभण आहे की नाही तुम्ही सहज ओळखू शकतात.तसेच जर गाभण असेल तर तिच्या अंगावर एक वेगळ्या प्रकारची चमक येते. म्हणजेच अंगावर खोबरेल तेल टाकल्यानंतर जशी शेळी चमकते तशी ती गाभण राहिल्यानंतर चमकायला लागते.
तसेच तुम्ही जर शेळीचा सड दाबून दुध काढले तर त्याला दुधासारखा पांढरा रंग नसतो व ते पाण्यासारखे दिसते व त्यामध्ये चिकटपणा जाणवतो. असेच दिसले तर तुम्ही समजू शकतात की तुमची शेळी गाभण आहे. तसेच तुम्ही शेळीच्या पोटाचे निरीक्षण करावे व तिचा पोटाचा घेर मोजून घेणे गरजेचे आहे. सहा आठवड्यामध्ये जर तिचे पोट एक इंच वाढलं तर शेळी ही गाभण आहे असे समजावे.
शेळीचा माज येण्याचा काळ कसा ओळखावा?
शेळी बोकड लागल्यानंतर जर ती तीन आठवड्यांमध्ये माजावर आली नाही तर ती गाभण आहे असे समजावे. एक सोपी पद्धत आहे. शेळी जर माज कालावधीत असेल तर ती तिची शेपूट वारंवार हलवत असते आणि ओरडते. तसेच या कालावधीमध्ये शेळी फार आक्रमक होते आणि दुसऱ्या शेळींवर चढण्याचा प्रयत्न करत असते. तसेच माज कालावधीमध्ये तिची दूध देण्याची क्षमता देखील कमी होते व या कालावधीत तिची योनी सुजलेली दिसते. त्यामधून पातळ द्रव्य निघत असल्याने तो भाग अस्वच्छ दिसायला लागतो.
अशा साध्या पद्धतीने तुम्ही शेळी गाभण आहे की नाही ओळखू शकतात तसेच माजावर आली आहे की नाही हे देखील ओळखू शकता.