Ahilyanagar News: पाथर्डी- शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
नुकसान भरपाई मंजूर
शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांतील काही भागांत अतिवृष्टी, तर काही ठिकाणी सततच्या पावसामुळे बाजरी, तूर, कापूस, मूग, सोयाबीन आणि खरीप कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे मुदतीत नुकसान भरपाईच्या तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानुसार, कंपनीने क्षेत्रीय पाहणी करून नुकसान भरपाई मंजूर केली आहे. मंजूर रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळेल, असे राजळे यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त शेतकरी
व्हीएसएल अंतर्गत शेवगाव तालुक्यातील मुंगी आणि बोधेगाव मंडलात ३,५३१ शेतकऱ्यांचे २,४३४ हेक्टरवरील नुकसान झाले, यासाठी १ कोटी १३ लाख ८२ हजार रुपये मंजूर झाले. पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर आणि खरवंडी मंडलात ३,२२६ शेतकऱ्यांचे १,४०८ हेक्टरवरील नुकसान झाले, यासाठी ४८ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले. एलएस अंतर्गत शेवगाव तालुक्यात ३४,५६९ शेतकऱ्यांचे २१,३६३ हेक्टरवरील नुकसान झाले, यासाठी ३० कोटी ३९ लाख ९५ हजार रुपये, तर पाथर्डी तालुक्यात २९,५९८ शेतकऱ्यांचे १२,६५५ हेक्टरवरील नुकसान झाले, यासाठी १३ कोटी २० लाख ९५ हजार रुपये मंजूर झाले. एकूण ४५ कोटी २३ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
आमदार राजळेंचा पाठपुरावा
या पीकविमा मंजुरीसाठी आमदार मोनिका राजळे यांनी शासन आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजळे यांनी या सर्व नेत्यांचे आणि विमा कंपनीचे विशेष आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
मागील खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, पीकविम्याच्या या मंजूर रकमेमुळे त्यांना आर्थिक आधार मिळेल. शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळावे, यासाठी आमदार राजळे यांनी केलेल्या प्रयत्नांचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होईल, यासाठी प्रशासन आणि विमा कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.