Goshala Subsidy : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकरी बांधव शेती सोबतच अतिरिक्त कमाई व्हावी यासाठी पशुपालनाचा व्यवसाय करतात. गाय, म्हैस यांसारख्या दुभत्या जनावरांचे पालन करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात खूप अधिक आहे.
मात्र अनेकजण गाईने दुध देणे बंद केल्यानंतर किंवा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गोवंश जंगलात सोडून देतात. मात्र या गोवंशाचे संवर्धन होणे देखील आवश्यक आहे. यामुळे शासनाकडून अशा गोवंशाचे संवर्धन व्हावे यासाठी एक कौतुकास्पद योजना सुरू करण्यात आली आहे.
भाकड गाई, अनुत्पादक, निरूपयोगी बैल, वळू इ. गोवंश सांभाळणाऱ्या म्हणजे गोशाळा चालवणाऱ्यांना आता अनुदान दिले जाणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना राबवली जात आहे.
ही योजना आता नवीन स्वरूपात नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळेला या अंतर्गत अनुदान मिळणार आहे.
जिल्ह्यातील इगतपुरी, बागलाण, पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला, निफाड, दिंडोरी व चांदवड या तालुक्यातील गोशाळांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयात सादर करावेत असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे. यापूर्वी देखील जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील गोशाळांना अनुदान मिळाले आहे.
2021-22 मध्ये त्र्यंबकेश्वर आणि 2023-24 मध्ये नाशिक, मालेगाव, कळवण, देवळा, नांदगाव या सहा तालुक्यांतील प्रत्येकी एका गोशाळेला अनुदान वितरित करण्यात आले आहे. आता उर्वरित नऊ तालुक्यांमधील गोशाळेकडून अनुदानासाठी अर्ज मागवले जात आहेत.
किती अनुदान मिळणार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 ते 100 पशुधन असलेल्या गोशाळेस 15 लाख, 101 ते 200 पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 20 लाख तर 200 पेक्षा अधिक पशुधन असलेल्या गोशाळेस रूपये 25 लाख एवढे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान एकवेळचे अनुदान आहे.