Agriculture News : पाथर्डी तालुक्यात यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, आता जुलै महिना संपत आला तरी परिसरात पावसाला सुरुवात झाली नाही फक्त भूरभूर पाऊस पडत असल्याने रस्त्यावर चिखल तयार होत आहे. भूरभूर पावसाने पिकांची वाढही खुंटली असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषधांची फवारणी करावी लागत आहे.
तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर, पाडळी, चितळी, हनुमान टाकळी व परिसरात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. तालुक्यात यावर्षी तब्ब्ल महिनाभर उशिराने पावसाने अल्पशा प्रमाणात हजेरी लावली या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मका बाजरी, मूग भुईमूग, या पिकांची पेरणी केली.

मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चार पाच दिवसांपूर्वी परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात अद्याप पर्यंत एकही मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
सध्या शेतात निंदणी, खुरपणी कामाची लगबग सुरु आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध प्रकारच्या अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट खोलमाडून जात आहे.
एकीकडे टोमॅटोला भाव आहे. मात्र, या पावसामुळे टोमॅटो पिकावरदेखील रोगराई निर्माण झाली आहे. त्यामुळे भाव असूनही शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही तर या भूरभूर पावसाने साथीच्या रोगांनादेखील आमंत्रण मिळत असून, डेंगूच्या डासांची निर्मिती होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.