शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Published on -

शिर्डी, दि. १ – केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत शिर्डी नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी केले आहे.

‘नक्शा’ प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भू-संसाधन विभागामार्फत देशभरातील १५२ शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, त्यामध्ये शिर्डीचा समावेश आहे.

शहरातील मिळकतीचे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण करून अचूक नकाशे तयार केले जात आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मिळकतींची पडताळणी करण्यात येणार आहे. सर्वे ऑफ इंडिया ही प्रकल्पाची तांत्रिक भागीदार संस्था असून, आधुनिक GIS प्रणालीच्या मदतीने भूअभिलेख अधिक अद्ययावत व शास्त्रशुद्ध स्वरूपात नोंदवले जाणार आहेत.

या प्रकल्पामुळे भूमालकीबाबतची स्पष्टता वाढेल, भूविकास प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच कर आकारणी अधिक अचूक होईल, मालमत्ता व्यवहार सुलभ होतील आणि शहरी नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल.

शिर्डीसह पंढरपूर, बारामती, कुळगाव-बदलापूर, वरणगाव, कन्नड, बुलढाणा, घुग्घस, खोपोली आणि मुत्तीजापूर या नगरपालिकांमध्ये ‘नक्शा’ प्रकल्पाचा पथदर्शी प्रयोग सुरू आहे. शिर्डी नगरपरिषद व भूमी अभिलेख विभाग संयुक्तपणे प्रकल्पाची अंमलबजावणी करीत असून, नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही प्रक्रिया यशस्वी होणार आहे , अशी माहिती श्री.थोरात यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!