अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील वीजबिल थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पंपाच्या वीजबिलाची थकबाकीची रक्कम एकरकमी शेतकऱ्यांनी भरली, तर या थकबाकीमध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे नवीन कृषीपंपांसाठी कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. मंत्री तनपुरे यांनी म्हटले, की राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे जवळपास ४० हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी ही सवलत योजना शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेली आहे.
या योजनेनुसार मागील पाच वर्षातील विलंब आकारणी शुल्क रद्द केले जाणार आहे, तसेच थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास ५० टक्के वीजबिल माफी दिली जाणार आहे.
तसेच या नवीन योजनेनुसार सर्व कृषी ग्राहकांना येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने दिवसासाठी कायमस्वरूपी ८ तास वीज पुरवठा करण्यात येईल. सद्य स्थितीत कार्यरत असणाऱ्या सर्व कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत.
यासाठी पायाभूत सुविधांच्या खर्चापोटी शासनामार्फत दरवर्षी १५०० कोटी रुपये याप्रमाणे २०२४ पर्यंत भाग भांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीला देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याच बरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम