Ahmednagar News : नगर बाजार समितीतील भुसार बाजारात मंगळवारी (दि.५) शेतकऱ्यांच्या मुगाला पुन्हा एकदा चांगला भाव मिळाला आहे. पाच शेतकऱ्यांचा मुगाचा प्रति क्विंटल १२ हजार ४४० रुपये या चांगल्या दराने लिलाव झाला आहे.
उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्यांची ही बाजार समितीमध्ये पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २४ ऑगस्ट रोजी एका शेतकऱ्याचा मुग प्रति क्विंटल ११ हजार १११ रुपये या उच्चांकी दराने विकला गेला होता.
भुसार बाजारामध्ये ताराचंद बोथरा यांचे आडतीवर झालेल्या लिलावामध्ये अविनाश काळे, दादाभाऊ काळे, विलास काळे (तिघे रा. अस्तगाव, ता. पारनेर), भाऊसाहेब अडसूळ (रा.हिवरे कोरडा), गणेश पतके (रा.पारनेर) या पाच शेतकऱ्यांच्या उच्चप्रतिच्या मुगाला प्रति क्विंटल १२ हजार ४४० रुपये असा दर मिळाला आहे.
दरम्यान, नगर बाजार समितीचे भुसार बाजारामध्ये मंगळवारी (दि. ५) शेतकऱ्यांनी ५०० गोण्या मुग विक्री करीता आणलेला होता. त्यास प्रतवारीनुसार ८ हजार ते १२ हजार ४४० रुपये प्रति क्विंटल तर हार्वेष्टरने केलेल्या मुगाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा सरासरी बाजार भाव मिळाला असल्याचे बाजार समितच्या वतीने सांगण्यात आले.
मुगाला सध्या चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्री करीता नगर बाजार समिती येथे आणुन जास्त दराचा फायदा घ्यावा असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, संचालक मंडळ व सचिव अभय भिसे आदींनी केले आहे.