अहिल्यानगर जिल्ह्यात मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी ‘जिवंत सातबारा’ अभियान सुरू, १ एप्रिलपासून अभियानाला सुरूवात!

Published on -

श्रीरामपूर: शेतजमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जिवंत सातबारा’ अभियान हाती घेतले असून, श्रीरामपूर तालुक्यात हे अभियान १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ दरम्यान राबवले जाणार आहे.

शेतजमिनींचे मालकी हक्क वारसदारांकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यासाठी सातबारा उताऱ्यावर त्यांची नोंद असणे आवश्यक असते. मात्र, अनेक मृत खातेदारांच्या वारसांची नोंद सातबाऱ्यावर वेळेत होत नसल्याने त्यांच्या जमिनीशी संबंधित व्यवहारांमध्ये अडचणी येतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठीच ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान, गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) ई-फेरफार प्रणालीद्वारे वारस फेरफार प्रक्रिया सुरू करतील. त्यानंतर, मंडळ अधिकारी सातबारा उताऱ्यात योग्य बदल करतील आणि अंतिम मंजुरी देतील.

वारसदार नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी खालील आवश्यक कागदपत्रे महसूल कार्यालयात सादर करावी:
मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला

वारसदारांचा सत्यप्रतिज्ञालेख किंवा स्वयंघोषणापत्र

पोलीस पाटील / सरपंच / ग्रामसेवक यांचा अधिकृत दाखला

सर्व वारसांची नावे, वय, पत्ते आणि संपर्क क्रमांक

रहिवासी पुरावा

गावातील शेतकरी आणि जमीनमालकांनी त्वरित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या नावे वारस नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच, कोणतीही अडचण आल्यास मंडळ अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ आणि निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी केले आहे.

या मोहिमेमुळे मृत खातेदारांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवर अधिकृत हक्क प्राप्त होईल, जमिनीच्या व्यवहारांतील कायदेशीर अडथळे दूर होतील आणि कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ सहज मिळू शकेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या हक्काची नोंद वेळेत करून घ्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News