मिरजगाव- कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार सुरू असून, तेथे शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतमालाला योग्य भाव मिळून शेती व शेतकरी समृद्ध व्हावा, हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
मुंबई येथे कर्जत तालुका बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी ना. शिंदे यांची भेट घेत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मंजूर, प्रस्तावित आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी संचालक बजरंग कदम, सुनिल शेलार उपस्थित होते.

बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले, ना. राम शिंदे यांच्या माध्यमातून व प्रयत्नांतून कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक वजन काटा उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याने त्याचे लोकार्पण पुढील महिन्यात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या र उपस्थितीत करण्यात येणार आहे.
त्या कामाची माहिती मी त्यांना दिली आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय तत्काळ घेतले जात आहेत. येथे सर्व सोयी सुविधांयुक्त असे शेतकरी भवन उभारण्याबाबत व बाजार समितीतील सर्व रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे, तसेच अत्याधुनिक हायमॅक्स दिवे बसविण्यात यावेत, याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यासाठी सभापती राम शिंदे यांनी हिरवा कंदिल दाखविला असून, निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.