काष्टीचा जनावरांचा बाजार दुसरीकडे भरवला जाणार, सभापती अतुल लोखंडे यांचा थेट इशारा

Published on -

श्रीगोंदा- तालुक्यातील काष्टी उपबाजाराची ओळख राज्यभरात आहे. या बाजारानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. पण काही स्थानिक पदाधिकारी आपल्या कृतींमुळे या बाजाराच्या नावाला काळिमा फासतायत, असा गंभीर आरोप श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी केलाय.

जर हा त्रास असाच सुरू राहिला, तर काष्टीचा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिलाय.

काष्टीचा जनावरांचा बाजार आज जिथे आहे, तिथपर्यंत पोहोचण्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते, स्व. शिवाजीराव नागवडे आणि स्व. शिवराम पाचपुते यांचं मोठं योगदान आहे.

त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा बाजार नावारूपाला आला. आजही बाजार समितीचं संचालक मंडळ आणि प्रशासन शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करतंय.

त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नातही चांगली वाढ झालीय. पण या सगळ्या सकारात्मक गोष्टींना काही स्थानिक पदाधिकारी आपल्या चुकीच्या कृतींनी गालबोट लावतायत.

काष्टी ग्रामपंचायतीच्या नावाखाली प्रवेश शुल्काच्या बहाण्यानं व्यापारी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून बेकायदा पैसे वसूल केले जातायत.

हे पैसे गोळा करण्यासाठी गुंडप्रवृत्तीच्या लोकांना पुढे केलं जातंय. या सगळ्यात बाजार समिती आणि ग्रामपंचायतीतील काही पदाधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप लोखंडे यांनी केलाय.

इतकंच नाही, तर बाजारातून जनावरं खरेदी करून त्यांना कत्तलीसाठी देण्याचा अवैध धंदाही या लोकांकडून चालतोय. अशा कृत्यांमुळे बाजाराच्या नावलौकिकाला धक्का बसतोय आणि शेतकरी-व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय, असं लोखंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.

याशिवाय, बाजारात अतिक्रमण करणं आणि बेकायदा व्यवसाय चालवण्यासाठी काही लोकांना जाणीवपूर्वक पुढे ढकललं जातंय, असा आणखी एक गंभीर आरोप लोखंडे यांनी केलाय.

दुसरीकडे, बाजार समितीचे संचालक साजन पाचपुते यांना अपात्र ठरवण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळानं घेतला. हा निर्णय साजन पाचपुते यांना चांगलाच झोंबलाय.

त्यामुळे आता लोखंडे आणि पाचपुते यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागलाय. हा वाद बाजार समितीच्या कामकाजावर आणि काष्टीच्या बाजारावर काय परिणाम करेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe