अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात, गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात १९१ मिमी कमी पाऊस

Published on -

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, जून महिन्यात आठ दिवस, तर जुलै महिन्यात ९ दिवस पाऊस झाला. पावसातील खंडामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी जुलैपर्यंत ३३१.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यावर्षी १९१ मिमी पाऊस कमी झाला. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत १८६.५ टक्क्यांनी पावसाची तूट झाली. तर वार्षिक सरासरीच्या ६५.३ मिमी पावसाची तूट आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात १०१५५ हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली. ५८ हजार २७४ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली. मका पिकाची १ लाख ९९ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीची ६७ हजार ६२५ हेक्टरवर पेरणी झाली.

मुगाची ४८ हजार १९ हेक्टरवर पेरणी झाली. उडीद ६७ हजार ४९४ हेक्टर पेरणी झाली. भुईमूग ४५३९ हेक्टर, तर सूर्यफूलाची ४३ हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनची सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१२ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ३८ हजार ४११ हेक्टरवर लागवड झाली.

संगमनेर व अकोले तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला आहे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्ध झालेली अॅडव्हायझरी संदेशाद्वारे पाठवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिली.

गतवर्षीच्या तुलनेत १९१ मिमी कमी पाऊस

अहिल्यानगर जिल्ह्यात २९ जुलैअखेर १४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै महिन्यात फक्त १६ दिवस पाऊस झाला. जूनमध्ये ८०.१ मिमी, तर जुलैमध्ये ६०.४ मिमी पाऊस झाला. मागील वर्षी २०२४ मध्ये जूनमध्ये १७७. ३ मिमी, तर जुलैमध्ये १५४.४ मिमी असा ३३१.७ मिमी पाऊस झाला. दोन महिन्यात पावसाचे दिवस ३४ होते. गतवर्षीच्या तुलनेत १९१.३ मिमी पावसाची तूट झाली. सरासरीच्या तुलनेत ६५ मिमी कमी पाऊस झाला.

पिके वाढीच्या अवस्थेत मात्र पाऊस नाही

खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या पिकांच्या आंतरमशागतीचे काम सुरू आहे. पावसात खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटलेली आहे. सद्यस्थितीत तूर १२ ते १५ इंचापर्यंत वाढलेली आहे. पाऊस नसल्यामुळे पावसाची वाढ खुंटली असून कापूस पीक ७ते ८ पानांवर आहे. पिकांची वाढ खुंटल्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे.

कापूस, मका व सोयानिवर किडरोगाचा प्रादुर्भाव

कापूस पिकावर काही प्रमाणात मावा, तुडतुडे व रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० इसी ३० मिली व तुडतुड्यांसाठी निंबोळी अर्क ६ टक्के किंवा डायमेथोएट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अकोले, संगमनेर परिसरात मका पिकावर लष्करी आळीचा
प्रादुर्भाव आहे. काही ठिकाणी तुरळक तांबूसपणा आहे. नियंत्रणासाठी इमोमेक्टीन बेन्झोंएट ५ टक्के प्रति एक लिटर पाण्यात तसेच निंबोळी अर्क फवारावा. सोयाबिनवर चक्री भुंगा, उंट अळीचा प्रादुर्भाव असून नियंत्रणासाठी इमोमेक्टीन बेन्झोंएट ५ टक्के प्रति एक लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!