अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ८८.२२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ३१ हजार ८२८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ६३ हजार ९८४ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ६ लाख ३१ हजार ८२८ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात भात पिकाचे सरासरी क्षेत्र १८ हजार ७४५ असून आतापर्यंत ६०५० हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली.

बाजरी पिकाचे सरासरी ८९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ५३ हजार २५९ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली. मका पिकाचे जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ७७ हजार ९९९ हेक्टर असून आतापर्यंत ९१ हजार २०८ हेक्टरवर मकाची पेरणी झाली आहे. नाचणी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५०० हेक्टर असून आतापर्यंत फक्त एका हेक्टरवर पेरणी झाली.
जिल्ह्यात तूर पिकाखालील ६४ हजार ५८४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ६४ हजार १३८ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली. जिल्ह्यात मूग पिकाखालील ५१ हजार ९८० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ४८ हजार १५० हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. उडीद पिकाखालील जिल्ह्यात ६७ हजार ५९५ हेक्टर क्षेत्र आहे. उडीदाची आतापर्यंत ६४ हजार २८० हेक्टरवर पेरणी झाली. भुईमुगाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ६५९९ हेक्टर असून आतापर्यंत भुई मुगाची ३९३२ हेक्टरवर पेरणी झाली. तीळ पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ८३.३८ हेक्टर आहे. आतापर्यंत १७ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली.
सूर्यफूल पिकाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र २१७ हेक्टर आहे. आतापर्यंत ४३ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली. सोयाबीनचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ७८ हजार ५३८ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ६३ हजार ९८४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. जिल्ह्यात कपाशीखालील सरासरी क्षेत्र १ लाख ५५ हजार ३२८ हेक्टर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ८६१ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.
जिल्ह्यात १८५८४ हेक्टरवर नवीन उसाची लागवड
अहिल्यानगर जिल्ह्यात १ लाख ३३ हजार २५७ हेक्टर ऊस पिकाखालील क्षेत्र आहे. यापैकी खरीप हंगामात आतापर्यंत १८ हजार ५८४ हेक्टरवर नवीन उसाची लागवड झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १३.९५ टक्के क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा सहकारी कारखानदारीसाठी प्रसिद्ध असून, ऊस लागवडीला यापुढे वेग येणार आहे. चांगला पाऊस झाल्यानंतर उसाची लागवड वाढण्याचा अंदाज आहे.
पाथर्डीत सर्वात कमी, तर अकोल्यात सर्वाधिक पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात १५ जुलैअखेर ११०.२ मिलीमीटर पावसाच नोंद झाली. यामध्ये नगर तालुक्यात ९१.३ मिमी, पारनेर १३०.७ मिमी, श्रीगोंद १००.७ मिमी, कर्जत ९७.४ मिमी, जामखेड ६९.३ मिमी, शेवगाव १०२.८ मिमी, पाथर्डी ६८.९ मिमी, नेवासा ८६.१ मिमी, राहुरी १०६.१ मिमी, संगमने १३६.१ मिमी, अकोला २१६.१ मिमी, कोपरगाव ११४.७ मिमी, श्रीरामपू ८२.१ मिमी, राहाता १०५.८ मिमी पावसाची नोंद झाली.