अहिल्यानगर : सध्या राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यात जिल्ह्यातील देखील तापमान कमालीचे वाढलेले आहे. मात्र ग्रामीण भागात अद्याप शेतीची कामे प्रलंबित आहेत.मात्र या वाढलेल्या तापमानामुळे शेतात काम करण्यास मजूर तयार नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
गेल्या तीन चार दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेचा कहर असाच सुरू राहिला, तर पुढचे दोन अडीच महिने शेतकरी बांधवांसाठी अग्निपरीक्षेचे ठरणार आहेत. उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शेतीकामाचे पूर्ण नियोजन कोलमडले असल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट आणखी तीन ते चार दिवस राहणार असल्याचा व काही दिवसात पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे. उन्हामुळे सकाळी ११ पासून ४ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कडक उन्हाळ्यापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी थंड पेयाचा आसरा घेतला आहे. तीव्र उष्णतेमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला असून, घरात थांबणे देखील मुश्किल झाले आहे. यातून सुटका होण्यासाठी अनेक जण झाडांच्या सावलीचा आश्रय घेत आहेत.
तर दुसरीकडे या उष्णतेचा शेती कामावर विपरित परिणाम झाला आहे. उन्हाच्या प्रकोपाने शेतातील पिके लवकर सुकू लागली आहेत. त्यातच महावितरणने आठवड्यातील सहा दिवस रात्रीचा वीजपुरवठा सुरू ठेवल्याने रात्री १० नंतर पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी बांधवांना शेतात जावे लागते. पाणी भरण्यामुळे झोप मिळत नाही, तर दिवसा प्रचंड उकाड्यामुळे झोप होत नाही. याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची अडचण आहे. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षांनंतर फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत चांगलीच थंडी होती.मात्र, मार्च महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली. दरवर्षी होळीनंतर उन्हाचा तडाखा सुरू होतो. यंदा मात्र, होळीच्या अगोदरच उन्हाचा कडाका सुरू झाला आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, तपमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास गेला आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. प्रचंड उष्णतेमुळे काम करण्यास मजूर धजावत नसल्याने नाइलाजाने पिकांचे खळे रात्री काढावे लागत आहे.