अहिल्यानगर : यावर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान साधारण राहील. यावर्षी सहा भाग पाऊस नद्या व पर्वत असलेल्या भागात होईल तर उर्वरित चार भाग पाऊस भुभागावर पडेल, त्यामुळे अन्न धान्य साठवून ठेवा, असे भाकित कर्जत येथील श्री गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले आहे.
कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांनी लिहून ठेवलेल्या संवत्सरीचे वाचन प्रत्येक वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारी केले जाते. यावेळी आगामी वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी भाविक तसेच या भागातील शेतकरी मंदिर व परिसरात गर्दी करतात, संवत्सरीचे वाचन गोदड महाराजांचे पुजारी हभप पंढरीनाथ काकडे यांनी केले.

यावेळी कर्जत परिसर व तालुक्यातील शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल, मात्र मान्सून पर्व पावसा अगोदर वादळे होतील, गारपीट, भुकंप होण्याची शक्यता आहे, हवामान बदलत राहील, वादळामुळे ढग पांगले जातील यामुळे पाऊस कमी होईल, म्हणून अन्न धान्य कमी होईल म्हणून त्याचा साठा करून ठेवावा, चैत्र महिन्यात उष्णतेचे प्रमाण जास्त राहील, यामुळे आगी लागण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होऊ शकतो, एकंदरीत आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, हस्त या नक्षत्रात पाऊस समाधानकारक होईल, काही भागात दुष्काळसदृश्य स्थिती राहील, जुन, जुलै व ऑगष्ट या महिन्याच्या काही कालावधीत मोठी पर्जन्यवृष्टी होईल, यावर्षी रोगराई मोठ्या प्रमाणात वाढेल, चोरांचा सुळसुळाट होईल, पाणी जपून वापरणे असे आवाहन हभप पंढरीनाथ काकडे यांनी केले आहे. असे भाकीत वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.