खरीप हंगामातील कांदा लागवड २७ टक्क्यांनी वाढणार, कृषी विभागाचे ३.६१ लाख हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट !

Published on -

कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात देशभरातील कांदा लागवडीचे उद्दिष्ट २७ टक्क्यांनी वाढवले असून त्यानुसार ही लागवड ३.६१ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत नेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

यामध्ये कांद्याचे सर्वोच्च उत्पादन घेणाऱ्या कर्नाटक राज्यातच १.५ लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट असून त्यातील ३० टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झाल्याची माहिती देखील कृषी विभागाने दिली आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा २०२४ च्या रब्बी हंगामातील असून तो मार्च ते मे या कालावधीत संकलित करण्यात आलेला आहे. २०२४ च्या रब्बी हंगामातील १९१ लाख टन कांद्यापैकी दरमहा १ लाख टनाची निर्यात मर्यादा कायम ठेवल्यास देशांतर्गत बाजारपेठेतील सुमारे १७ लाख टनांची मासिक मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे.

हंगाम सुरू असताना व त्यानंतर उत्पादन संकलित करताना यंदा हवामान कोरडे राहिल्यामुळे कांद्याचे नुकसान कमी झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात घेतलेला कांदा बाजारात आणल्यामुळे आता कांद्याची उपलब्धता आणि मोसमी पावसाला झालेली सुरुवात यामुळे साठवणीतील कांद्याच्या नुकसानीची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर कांदा लागवडीचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात वाढवल्याचे स्पष्ट झाले आहे. कांद्याचे पीक तीन हंगामात घेतले जाते. मार्च ते मे हा रब्बी हंगाम, सप्टेंबर ते नोव्हेंबर खरिपाचा आणि जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे उशिराचा खरीप हंगाम.

यापैकी रब्बी हंगामात एकूण उत्पादनाच्या ७० टक्के कांद्याचे उत्पादन होते, तर, खरीप व उशिराच्या खरीप हंगामात मिळून ३० टक्के उत्पादन होते. रब्बी आणि खरिपाच्या सर्वोच्च उत्पादनाचा काळ यांच्या दरम्यान येणाऱ्या कमी उत्पादनाच्या महिन्यांमध्ये कांद्याचा दर स्थिर ठेवण्यात खरिपाचा कांदा महत्त्वाची भूमिका बजावतो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!