तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरुवात ! बफर स्टॉकची मर्यादा वाढवली

Ahmednagarlive24 office
Published:

Onion News : कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने व्यापाऱ्यांनी असहकार पुकारत लिलावात भाग न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला

असंतोष कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ अर्थात ‘एनसीसीएफ’ने तातडीने तीन हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदीला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर लाल कांद्याची खरेदी होत आहे, तर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ नाफेड बुधवारपासून कांदा खरेदीला प्रारंभ करणार आहे. हे दोन्ही संघ जवळपास दोन लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारच्या आदेशाने खरेदी करणार आहेत.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बफर स्टॉकमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी सर्व बाजार समित्यांमधून सुमारे दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. यात एक लाख टन कांदा एनसीसीएफकडून खरेदी केला जाणार आहे. निफाड, चांदवड, नामपूर, मालेगाव, उमराणे, पिंपळगाव, मुंगसे, लासलगाव, विंचूर, ताहाराबाद, दाभाडी आणि देवळा येथे ही खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

कांदा विक्री करताना शेतकऱ्यांकडे आधार कार्ड झेरॉक्स, सातबारा उताऱ्यावर कांदा खरीप हंगाम पीक पेरा लागलेला हवा, बँक पासबुक झेरॉक्स ही सर्व कागदपत्र स्वतःची स्वाक्षरी करून जमा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने यावर्षी एनसीसीएफ व नाफेड यांच्यामार्फत आतापर्यंत ५.१० लाख टन कांदा खरेदी केला असून, सुमारे दोन लाख टन अधिक खरीप कांद्याची खरेदी केली जाणार आहे.

सामान्यतः सरकार रब्बी कांद्याची गुणवत्ता लक्षात घेऊन खरेदी करते, जो जास्त काळ टिकतो आणि खराब होत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि किरकोळ बाजारातील भाववाढ रोखण्यासाठी सरकार यंदा पहिल्यांदाच खरीप कांदा पिकाची खरेदी करणार आहे.

प्रहार शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव घसरल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीचा निर्णय तत्काळ मागे घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा,

अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे कैलास पवार यांची भाषणे झाली. यावेळी चंद्रभान झोडगे, जनार्दन भागवत, निवृत्ती सोनवणे उपस्थित होते.

लाल कांद्याची दुसऱ्यांदा खरेदी

एनसीसीएफमार्फत यंदा दुसऱ्यांदा लाल कांद्याची खरेदी होत असल्याचे शेतकरी सांगतात. कांद्याचा दर्जा, प्रत, गुणवत्ता बघूनच खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बारदानी गोण्यामध्ये पॅक केलेला, तसेच ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या कांद्याचीही थेट खरेदी होत असल्याचे एनसीसीएफच्या अधिकाऱ्यानी सांगितले.

बफर स्टॉकची मर्यादा वाढवली

बफर स्टॉक राखण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी, तसेच कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकारकडून बाजारातील हस्तक्षेप वाढवण्यात येत आहे. त्या माध्यमातून सरकार कांदा खरेदी करत आहे.

सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कांद्याच्या बफर स्टॉकचे उद्दिष्ट सात लाख टनांपर्यंत वाढवले आहे, तर गेल्या वर्षी वास्तविक साठा केवळ तीन लाख टन होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe