Maharashtra News : महाराष्ट्रासह अन्य राज्यांत यंदा कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत कांद्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सध्या कांदा १७०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने बाजार समितीत विक्री होत आहे.
हाच कांदा दिवाळीत पाच ते सहा हजार रुपये क्विंटल या दराने विक्री होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कांदा दर वाढतील, या भीतीनेच केंद्र सरकारने दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यासह निर्यातमूल्य लावण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाच्या एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांत कांद्याची सर्वाधिक लागवड केली जाते. यंदा १९८२ सालानंतर सर्वात मोठ्या दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.
त्यामुळे खरिपाची लागवड अत्यल्प प्रमाणात झाली आहे. त्याचा परिणाम दिवाळीनंतर बाजारात येणाऱ्या कांद्यावर होणार आहे. यंदा ७० टक्क्यांनी बाजारातील आवक घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत कांदा दरवाढीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.
कांदा हे व्यापारीदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र व उत्पादनाबाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे प्रामुख्याने कांदा पिकवण्यास प्रसिद्ध आहेत. तसेच मराठवाडा, विदर्भ व कोकणातसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते.
नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नव्हे, तर सबंध भारतात कांदा पिकवण्यास प्रसिद्ध आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील ४० टक्के, तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.
परंतु, यंदा नाशिकसह राज्यभरात दुष्काळाचे संकट असल्यामुळे खरिपाची कांदा लागवड होऊ शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपात २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली होती.
यंदा मात्र ती ऑगस्टअखेर एक हजार १०३ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. अजून १५ सप्टेंबरपर्यंत लागवडीचा कालावधी असला तरी अपेक्षित पाऊस होत नसल्याने आता कांदा लागवड होण्याची शक्यता मावळली आहे.
त्यातच यंदा जानेवारी व फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळीमुळे कांदा भिजला. गारपिटीमुळे सडला. दर्जा घसरलेल्या कांद्याला बाजारात दर मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा काढण्यापेक्षा शेतातच गाडून टाकला.
शेळ्या-मेंढ्या कांद्यात सोडल्या. अनेक शेतकऱ्यांनी कांदा उकिरड्यावर, रस्त्यावर फेकून दिला. तर काही शेतकऱ्यांनी हा कांदा चाळीत साठवला. सध्या बाजारात जो उन्हाळी कांदा दाखल झाला आहे. तोदेखील अल्प प्रमाणात आहे.