मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, त्यांना फोन द्या, मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, त्यांना फोन द्या, मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी दिली. डायल ११२ वर फोन करून पोलिसांची दिशाभूल करत सार्वजनिक सुरक्षेस बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे, रा. हसनापूर, ता. शेवगाव याला पोलिसांनी पाथर्डी अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २.२० वा. डायल ११२ वर फोन करून मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला असून, मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असे सांगून ढाकणे याने नीट माहिती दिली नाही.

त्यानंतर मी व पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोना. अल्ताफ शेख, असे तिघेजण ढाकणे याच्या शोधासाठी गेलो. ढाकणे यास फोन केला असता, प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यानंतर आम्ही सदर इसमाचा शोध घेतला असता, तो बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (वय ३४), रा. हसनापूर, ता. शेवगाव येथील असून, त्यास शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाल्याने त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस स्टेशनला आणले.

सदर इसम दारूच्या अंमलाखाली असल्यासारखा वास आल्याने त्याची उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी येथे तपासणी करण्यात आली. तपासणी केली असता, तो दारूच्या अंमलाखाली असल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असल्याचे समजते.

पोना. निलेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन ढाकणे याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ढाकणे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुहास बटुळे हे करीत आहेत.