माळरान जमिनीवर लाल सोन बहरल, मराठमोळ्या शेतकऱ्याचा डाळिंब शेतीचा यशस्वी प्रयोग, एकरी 10 टन उत्पादनाची किमया साधली

नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमधल्या असंख्य संकटांचा सामना करत शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई काढून दाखवली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील प्रयोगशील शेतकरी प्रकाश बाळू शिंदे यांनी आठ एकर माळरान जमिनीवर डाळिंबाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.

Tejas B Shelar
Published:

Pomegranate Farming : शेतीचा व्यवसाय हा आव्हानात्मक बनला आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतीचा व्यवसाय परवडत नाहीये. कोणत्याच पिकांमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. पण जर बाजाराचा योग्य अभ्यास करून आणि निसर्गाचे चक्र ओळखून शेतीमध्ये काळानुरूप बदल केला तर नक्कीच शेतीमधून चांगले उत्पादन मिळू शकते आणि उत्पादित झालेल्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उदाहरणातून ही गोष्ट अधोरेखित करून दाखवलेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमधल्या असंख्य संकटांचा सामना करत शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई काढून दाखवली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील विंचुरे येथील प्रयोगशील शेतकरी प्रकाश बाळू शिंदे यांनी आठ एकर माळरान जमिनीवर डाळिंबाची यशस्वी शेती करून दाखवली आहे.

शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 16 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. यापैकी निम्म्या जमिनीवर म्हणजेच आठ एकर जमिनीवर त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की, ही आठ एकर जमीन माळरान आहे. यासाठी शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

खरे तर त्यांची जमीन ही डोंगराच्या पायथ्याशी आहे. खडकाळ मुरमाड जमीन आहे. एवढेच नाही तर त्या जमिनीत पाणी नाहीये. यामुळे विहिर खोदण्याचा काही प्रश्न सुभारात नाही. खडकाळ आणि असमतल जमीन इथपर्यंत ठीक होतं मात्र जमिनीत पाणीच नसल्याने शेती होणार कशी हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.

मात्र शिंदे यांनी हार मानली नाही आणि पीव्हीसी पाईपच्या साह्याने पाईपलाईन करून त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे. तब्बल तीन किलोमीटर लांबून पाईपलाईन करून त्यांनी डाळिंबाच्या बागेसाठी पाण्याची उपलब्धता केली आहे. मात्र तीनदा या डाळिंब बागेतून उत्पादन मिळवल्यानंतर तेल्या रोगाने त्यांच्या बागेचे मोठे नुकसान केले.

शेवटी नाईलाजाने त्यांना त्यांची बाग उपटून टाकावी लागली. डाळिंब काढून टाकल्यानंतर त्यांनी द्राक्षाची लागवड केली. द्राक्ष पिकातूनही सुरुवातीच्या काळात चांगली कमाई झाली मात्र नंतर जास्तीच्या पावसाने या पिकाचेही नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत चर्चा केली आणि पुन्हा एकदा डाळिंब शेतीत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

आता त्यांचे झाड हे 24 महिन्यांचे झाले असून पहिल्याच बहारात एकरी दहा टन पर्यंतचे विक्रमी उत्पादन मिळवण्यात त्यांना यश आले आहे. म्हणजेच आठ एकर जमिनीतून त्यांना 80 टन एवढे डाळिंबाचे उत्पादन मिळणार आहे. यामुळे सध्या शिंदे यांची पंचक्रोशीत चर्चा आहे.

हार न मानता शिंदे यांनी फुलवलेली डाळिंबाची ही शेती नक्कीच इतरांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीचा व्यवसाय नक्कीच आव्हानात्मक आहे मात्र जर शेतीमध्ये सातत्य ठेवले, काळानुसार पीक पद्धतीत बदल करत राहिले तर नक्कीच यातून चांगली कमाई करता येऊ शकते हेच शिंदे यांचा हा प्रयोग अधोरेखित करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe