Dussehra 2023 : अष्टर व शेवंतीचे भाव भडकले तर झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळले !

Ahmednagarlive24 office
Published:

Dussehra 2023 : दसरा सणाला फुलांना महत्त्वाचे स्थान असते. घरोघरी फुलांचे हार घालून शस्त्रे तसेच वाहनांची विधिवत पूजा केली जाते. आपट्याच्या पानांना श्रद्धापूर्वक सोनं म्हटलं जातं. आता आपट्याची पाने दुर्मिळ झाली आहेत. ग्रामीण भागात कचितच ठिकाणी आपट्याची वनस्पती आढळून येत.

फुलांप्रमाणेच आपट्याच्या पानालाही दसरा सणाला विशेष महत्व असते. एकमेकांना आपट्याची पाने देवून दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात. थोरा-मोठ्यांकडून लहानांना आशिर्वाद दिले जातात. ठिकठिकाणी विधिवत पूजेने सिमोल्लंघन केले जाते. स्त्री, पुरुष नटून थटून दसरा सण साजरा करतात. दसरा सणाचे इतिहासात वेगवेगळ्या प्रकारचे प्रेरणादायी दाखले दिलेले आहेत.

दरम्यान दसरा या सणासाठी नगरच्या मार्केटयार्ड मध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या फुलांची आवक झाली असून, अष्टर व शेवंतीचे भाव चांगलेच भडकले आहेत तर झेंडू गडाडला आहे. अष्टरला प्रतिकिलो २५० इतका भाव मार्केटमध्ये मिळत असून, १०० शेवंतीनेही च्या आसपास भाव गाठला आहे.

झेंडू मात्र ३० ते ४० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. सोमवारी (दि.२३) दिवसभर मार्केटयार्ड तसेच माळीवाड्यात ठिकठिकाणच्या शेतकरी तसेच व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणली होती. सामवार, सोमवारी रात्री उशिरापर्यंत फुलांची विक्री सुरूच होती.

नगर त्याचप्रमाणे शेजारील जिल्ह्यातूनही रोकडी पिक-अप या वाहनातून फुले विक्रीसाठी आणण्यात आली होती. अष्टर, शेवंती, केशरी व पिवळा झेंडू तसेच आपट्याची पानेही (सोनं) शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली.

मार्केटयार्डच्या आतील तसेच बाहेरील परिसरात फुल विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली होती सोमवारी रात्री उशिरापर्यंत फुले खरेदी करण्यासाठी फारशी गदी आढळून आली नाही.

मात्र, आज (दि. २४) दसरा सण असल्याने फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची मंगळवारी झुंबड उडेल, असे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी फुलांची आवक मध्यम होती यंदा असमाधानकारक पाऊस झाला असला तरी मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन झाले.शिरूर, नाशिक, संभाजीनगर आदी जिल्ह्यातून फुले विक्रीसाठी नगरला आणण्यात आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe