राहुरी कृषी विद्यापीठाचा दुधी भोपळा देशभर गाजणार! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी !

Published on -

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाने विकसित केलेला दुधी भोपळ्याचा सुधारित वाण आर.एच.आर.बी.जी. ५४ (फुले गौरव) याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना येथे पार पडलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा बैठकीत हा वाण मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रसारित करण्यास मंजुरी देण्यात आली.

हा नवीन सुधारित वाण डॉ. बी. टी. पाटील, वाय. आर. पवार आणि डॉ. एस. ए. अनारसे यांनी विकसित केला आहे. या वाणाची फळे मध्यम लांबीची (२७ ते ३० सेमी.), दंडगोलाकार आणि सरासरी वजन ५४० ते ५५० ग्रॅम आहे. हा वाण भुरी आणि केवडा रोगास प्रतिकारक्षम असून ४१३ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न देतो.

बैठकीस पंजाब कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सनबिर सिंग पॉसाल, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहसंचालक डॉ. संजय सिंग, भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. राजेश कुमार यांसारख्या अनेक मान्यवर तज्ज्ञांनी हजेरी लावली. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या एकूण सहा शिफारसींना मंजुरी देण्यात आली, ज्यामध्ये भाजीपाला लागवड, बीजोत्पादन आणि पीक संरक्षण यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, माजी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिके, माजी संशोधन संचालक डॉ. एस. डी. गोरंटीवार, तसेच माजी विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.’फुले गौरव’ वाणाच्या राष्ट्रीय प्रसारामुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधनाला मोठा सन्मान मिळाला आहे. हा नवीन वाण उत्पन्न वाढ, रोगप्रतिकारशक्ती आणि गुणवत्ता यामध्ये उत्कृष्ट असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठा लाभदायक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe