अहिल्यानगर- पुणतांबा परिसरात वरुण राजाने रविवारी व सोमवारी कृपादृष्टी केल्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, तूर या पिकांना जीवदान मिळालेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पुणतांबा परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व ओलाव्याच्या आधारे सोयाबीन, तूर, मका, कपाशी यासारख्या खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली होती. या पिकांची उगवण चांगली झालेली होती. मात्र, काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने या पिकांना पाण्याची खूप गरज होती.
जर एक-दोन दिवसात पाऊस पडला नसता तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असते. मान्सूनपूर्व व जून महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, मका, तूर पिकांची पेरणी केलेली होती. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ही उगवण झालेली पिके सुकू लागलेली होती. परंतु आषाढी एकादशीला सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली, ती रात्रभर सुरूच होती. काल सोमवारीही सकाळपासूनच संततधार सुरू होती तर संध्याकाळी पाच वाजता चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला.

या पावसाचा फायदा खरीप हंगामातील पिकांना होणार असल्यामुळे शेतकरी वर्गावर ओढावलेले दुबार पेरणीचे संकट टळले आहे. सलग दोन दिवस झालेल्या बऱ्यापैकी पावसाने कोमेजून गेलेली पिके पुन्हा नव्या जोमाने उभी राहणार असल्याने परिसरातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दोन दिवस सलग पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालेले आहे त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. – विजय धनवटे, प्रगतीशील शेतकरी.
जर सलग दोन दिवस वरुण राजाने कृपादृष्टी केली नसती तर शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असता. – सुधाकर जाधव, प्रगतीशील शेतकरी