भारतामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्याकरिता भारतीय हवामान विभाग कार्यरत असून हवामानाच्या विविध पैलूंचा अभ्यास करून सर्वसमावेशक अंदाज वर्तवणारी ही संस्था आहे. परंतु आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर बऱ्याचदा हवामान विभागाचे अंदाज चुकताना दिसतात. या संस्थेसोबतच बरेच हवामान अंदाज वर्तवणारे अभ्यासाक देखील असून त्या त्या परिने ते त्यांचे अंदाज वर्तवत असतात.
परंतु या हवामान अभ्यासांपैकी जर आपण पंजाबराव डख या नावाचा विचार केला तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे आणि एक प्रसिद्ध असे नाव आहे. गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहिला तर त्यांच्या हवामानाचे अंदाज बहुतांशी खरे ठरलेले आहेत.
त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्यांनी वर्तवलेल्या अचूक हवामान अंदाज यांचा फायदा होताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या या कामांमध्ये पारदर्शकता यावी व त्यांना हे काम सुलभ जावे त्याकरिता साई अरिहंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून काही मागण्या केलेल्या आहेत.
सतीश गंगवाल यांनी केल्या निवेदनाद्वारे विशेष मागण्या
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हवामानाचे प्रसिद्ध अभ्यासक पंजाबराव डख यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावे तसेच त्यांचा या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्यांना शासनाच्या माध्यमातून सुविधा तसेच यासाठी लागणारी यंत्रसामग्री व कार्यालय याकरिता जागा देखील उपलब्ध करून द्यावी, असे निवेदन साई अरिहंत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश गंगवाल यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
काय म्हटले आहे निवेदनात?
सतीश गंगवाल यांनी निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे मित्र तसेच हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी गेल्या काही वर्षापासून हवामान अभ्यासाविषयी अचूक अंदाज देऊ शेतकऱ्यांचे शेतीमालाचे होणारे नुकसान टाळले आहे. नुकसान कमी होण्यास मदत झाली असून त्यांना या हवामानाचा अधिक अभ्यास करण्याकरिता शासनाने एक मोठे कार्यालय तसेच उपग्रहाद्वारे रिसर्च करता यावा याकरिता आवश्यक उपकरणे उपलब्ध करून द्यावी व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी देखिल शासनाने पुढाकार घ्यावा इत्यादी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जर पंजाबराव डख यांच्याकरिता जर शासनाने वरील बाबींची पूर्तता केली तर त्यांना हवामानाचा अधिक चांगला आणि अचूक अंदाज देता येईल व या अंदाजाचा फायदा शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे आपण शासन दरबारी यासंबंधीची मागणी मांडावी अशी देखील निवेदनामध्ये सतीश गंगवाल यांनी नमूद केले असून हे निवेदन महसूल मंत्री विखे पाटील यांना देण्यात आलेले आहे.