Soybean Farming: भारतात सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची पेरणी सुरू आहे. राज्यात देखील खरिपातील पेरणी सुरू आहे. खरीप हंगामात राज्यात सर्वत्र सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड (Soybean Cultivation) केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे.
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. खरं पाहता सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पिक आहे. यामुळे सोयाबीनची बारामाही बाजारात मोठी मागणी असते.
शिवाय गत खरीप हंगामात उत्पादित केलेल्या सोयाबीनला चांगला समाधान कारक बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात सध्या सोयाबीनचा पेरा सुरू आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन आता अंकुरायला सुरुवात झाली आहे.
अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याचे (Farmer) सोयाबीन सव्वा फूट उंचीचे झाले आहेत. केज तालुक्यातील आडस येथील प्रयोगशील शेतकऱ्याने योग्य नियोजन करून त्यांचे सोयाबीन सव्वा फूट उंचीपर्यंत वाढवले आहे. यामुळे सध्या या शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे. या प्रयोगशील शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत.
मौजे आडस येथील रमेश प्रकाश शेंडगे हे व्यवसायाने वकील आहेत. मात्र असे असले तरी त्यांचे शेतीवरील प्रेम काही कमी झालेले नाही. यामुळे वकील साहेबांनी त्यांच्याकडे असलेली 8 हेक्टर 20 आर शेतीजमीन कसण्यास सुरवात केली आहे. रमेश दादा यांनी आपली शेती सांभाळण्यासाठी एक सालगडी ठेवला आहे.
खरं पाहता या वर्षी सोयाबीनची पेरणी 25 जून नंतर सर्व राज्यात बघायला मिळाली. मात्र रमेश यांनी एक नवीन प्रयोग केला आणि सोयाबीनची पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यातच उरकली. त्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून त्यांचे सोयाबीन एक ते सव्वा फूट उंचीचे वाढले आहेत. रमेश यांनी 6 एकर शेतीजमिनीत सोयाबीनची पेरणी केली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस नसताना देखील रमेश यांनी रिस्क घेत सोयाबीनची पेरणी करण्याचे ठरवले. रंगाने त्यांनी बेड पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आणि आज रमेश यांनी केलेला हा प्रयोग सक्सेस झाला असून, हा प्रयोग पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी रमेश यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत.
रमेश यांच्या मते त्यांनी 7 जून रोजी पाऊस नसताना देखील सोयाबीनची पेरणी केली आणि विशेष म्हणजे त्यांनी पेरलेले सोयाबीन 100% उगवले. रमेश यांनी जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे सोयाबीन पेरणी करण्याआधी आठ तास स्प्रिंकलरने जमिनीला पाणी दिले.
पाणी दिल्यानंतर कापसा प्रमाणे सोयाबीनची पेरणी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्प्रिंकलरने दोन तास सोयाबीनच्या बियाण्याला पाणी दिले. एवढ्याच पाण्यावर रमेश यांनी पेरलेले सोयाबीन 100% उगवले असल्याचा त्यांचा दावा आहे.
विशेष म्हणजे पेरणी केल्यानंतर रमेश यांनी केवळ एकदा सोयाबीन पिकाला पाणी दिले तरी सुद्धा त्यांचे सोयाबीन जोमाने बहरले असून सध्या ते एक ते सव्वा फूट उंचीचे झाले आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी 25 जून नंतर सोयाबीनची पेरणी केली आहे.
अशा परिस्थितीत सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे केवळ एक पाणी किंवा दोन पाणी आहे. मात्र रमेश यांचे सोयाबीन चक्क सव्वा फूट उंचीचे झाले असल्याने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हा एक आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.