अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Krushi news :- नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने आपला पावसाविषयीचा पहिला अंदाज वर्तविला. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) आधी ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज वर्तवला होता.
या दोन्ही पावसाच्या अंदाजात साम्य आढळत असून आगामी पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा प्रसन्न आहे.
शेतकरी बांधवांना (Farmer) आता खरिपात (Kharip Season) चांगल्या उत्पादनाची आशा आहे. खरिपात चांगला पाणी-पाऊस राहणार असल्याने शेतकरी बांधव या वर्षीदेखील खरीप हंगामात सोयाबीन पिकाला (Soybean crop) अधिक पसंती दर्शविणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी बांधव पूर्व मशागतीची कार्य जोरावर करीत आहे तर दुसरीकडे कृषी विभाग देखील खरीप हंगामासाठी मैदानात उतरले आहे.
कृषी विभागाच्या मते, यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनला मागणी वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. यामुळेच गेल्या तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यात बघायला मिळत आहे. एकीकडे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे तर गतवर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाल्याने सोयाबीनच्या क्षेत्रात अजून वेगात वाढ होऊ शकते असा अंदाज आता खुद्द कृषी विभागाने वर्तविला आहे.
याशिवाय सोयाबीन पिकासाठी इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे यामुळे या पिकाकडे शेतकरी बांधव अधिक वळत असल्याचे सांगितले जात आहे.
खरं पाहता सोयाबीन हे तर खरीप हंगामातील पीक आहे. मात्रराज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाला उन्हाळी हंगामातील उत्पादित करून दाखवले आहे.
पुणे जिल्ह्यातही अनेक तालुक्यात उन्हाळी हंगामात सोयाबीन पिकाची लागवड बघायला मिळाली. यामुळे निश्चितच खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने आता कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी कार्य आता सुरू करण्यात आले आहे.
आगामी काही दिवसात तालुकानिहाय कृषी विभागाची आढावा बैठक पार पडणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या कृषी विभागाने खरीप हंगामातील तात्पुरता आराखडा आखला आहे. यामध्ये कृषी विभागाला सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे आढळले आहे.
निश्चितच सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने सोयाबीनच्या बियाण्यासाठी कृषी विभागाकडून जोरात तयारी सुरू केली गेली आहे.