ऊस तोडणी, ओढणी कामगार २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर !

Published on -

Maharashtra News : यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबरपूर्वी बैठक घेऊन आगामी तीन वर्षांसाठीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा; अन्यथा २६ सप्टेंबरपासून ऊस तोडणी, वाहतूक कामगार, मुकादम व वाहतूकदार बेमुदत संपावर जातील,

असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी शनिवारी (दि. २६) पत्रकार बैठकीत दिला.

ऊस तोडणी, वाहतूक कामगारांची मजुरी, वाहतुकीचे दर व मुकादमांचे कमिशन याविषयी २० ऑक्टोबर २०२० रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता. याची मुदत गत हंगामाबरोबरच संपली आहे.

त्यामुळे आगामी तीन हंगामांसाठीचा नवीन त्रिपक्षीय करार करण्यासाठी राज्य शासनाचे प्रतिनिधी, साखर संघाचे प्रतिनिधी आणि ऊस तोडणी व ओढणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समितीची बैठक २५ सप्टेंबरपूर्वी घ्यावी.

या बैठकीत हा नवीन करार करण्यासह विविध मागण्यांची पूर्तताही तत्काळ करावी; अन्यथा २६ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या वेळी राज्य उपाध्यक्ष आबासाहेब चौगले, दिनकर पुरे, ज्ञानदेव वंजारे, रामचंद्र कांबळे, साताप्पा चांदेकर, बाबासाहेब साळोखे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe