शेतमालकांवर मजुरांच्या वाढत्या टंचाईची टांगती तलवार !

Updated on -

११ मार्च २०२५ सुपा : शेतीसाठी येणारा अमाप खर्च, त्यात अधिक क्षेत्र असल्याने मजुरांची व आर्थिक टंचाई, कामासाठी येण्याच्या विणवण्या, त्यात शेतमजूरांच्या संख्येत होणारी घट, सातत्याने होणारी मजुरीच्या दरात होणारी वाढ, यामुळे शेती न परवडण्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.

शेतातील विविध कामे करण्यासाठी लागणाऱ्या शेतमजुरांच्या दरात वाढ झाली आहे. काही वर्षापासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे पूर्वीच्या काळापेक्षा शेतकामांच्या दरात वाढ झाली आहे. पुरुषांसाठी ४०० रुपये तर महिलांना ३०० रु. असा दर आकारला जात आहे.

तसेच लांबच्या पल्ल्यासाठी शेतमालकांना आपल्या वाहनाने शेतात मजुरांना पोहच करण्याचे मजुरांकडून सूचित केले जात आहे, त्यामुळे मजुरांची वाढती टंचाई शेत मालकांसाठी मोठी समस्या बनत चालली आहे. अधिक शेतक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

काही भागात मजूर मागतील, ती मजुरी देऊन त्यांना आपल्याकडे कामाला नेले जात आहे. शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासणे ही एक प्रमुख समस्या आहे. बदलते पावसाचे स्वरूप व भूजलाची कमतरता, शेतमजूर मोठया प्रमाणात बिगर कृषी क्षेत्राकडे वळणे, शेत मशागतीची बहुतांशी कामे बैल व मजुरांएवजी ट्रॅक्टरने केली जात आहेत. कारण शेतमजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. अल्पभूधारक शेतकरी व भूमिहिन मजुरांना वर्षभर कामाच्या शोधात स्थलांतरित व्हावे लागत आहे, त्यामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

शिवाय मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बसत असल्याने ज्यांना शक्य आहे ते शेतकरी घरच्या घरीच शेतीची कामे करीत आहेत.आजच्या घडीला बदलते हवामान, पावसाची अनियमितता, पीक पद्धती, रासायनिक घटकांचा वाढता वापर, यामुळे पिकांवर होणारे विपरित परिणाम व ते परिणाम कमी करण्यासाठी लागणारा अनावश्यक खर्च या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या जीवनाचा भाग झाल्या आहेत.

यात आणखी भर म्हणजे गेल्या तीन-चार वर्षापासून मजुरांच्या समस्येने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आधी कामासाठी मजूर शेतकऱ्यांच्या घराभोवती घिरट्या घालायचे आता मात्र शेतकऱ्याला त्यांची विनवणी करावी लागत आहे, अशी वास्तविक परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शोधलेले तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, तेव्हा कुठे मजुरांच्या अनुपलब्धतेवर शेतकऱ्यांना तोडगा मिळेल, असे दिसते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe